नगरपालिका, ग्रामपंचायतींना अनुदानावर एलईडी दिवे देणार
By Admin | Updated: March 2, 2016 02:24 IST2016-03-02T02:24:14+5:302016-03-02T02:24:14+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणा सक्षम करणार असल्याचे पालकमंत्र्याचे आश्वासन.

नगरपालिका, ग्रामपंचायतींना अनुदानावर एलईडी दिवे देणार
बुलडाणा: एलईडी दिव्यांचा सार्वत्रिक वापर जास्तीत जास्त वाढण्यासाठी नगरपालिका व ग्रामपंचायतींना अनुदानावर दिवे देणार असल्याचे सांगत, उपलब्ध विजेचा काटेकोर उपयोग करून वहनातील होणारी हानी टाळली पाहिजे, असे आवाहन राज्याचे महसूल, कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.
एलईडी दिवे वितरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मलकापूर येथे मराठा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री खडसे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर आ.अँड. आकाश फुंडकर, आ.डॉ. संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, महावितरणचे अकोला मंडळाचे मुख्य अभियंता के.जे. मेश्राम, अधीक्षक अभियंता किशोर शेगोकार आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री खडसे म्हणाले की, एलईडीच्या वापरामुळे विजेची बचत होऊन तीचा वारेमाप वापर थांबेल. पारंपरिक स्रोतांपासून वीजनिर्मितीस र्मयादा येत आहे. त्यामुळे अपारंपरिक स्रोतांचा जास्तीत जास्त उपयोग करावा लागणार आहे. सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती वाढवावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जिल्ह्यात एकही गाव विजेशिवाय राहू देणार नसल्याची ग्वाही देत पालकमंत्री खडसे म्हणाले.
दीनदयाल उपाध्याय योजनेत आठ उपकेंद्रांना मंजुरी देण्यात आली असून, १७२ रोहित्रे नवीन बसविण्यात येणार आहे. एकात्मिक वीज विकास योजनेंतर्गत जिल्ह्याला १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत १२ उपकेंद्रांची कामे जिल्ह्यात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता किशोर शेगोकार यांनी केले. आभार महावितरणचे पीआरओ विकास आढे यांनी मानले.
कार्यक्रमादरम्यान गणेश पांडव, चुन्नुगिरी अर्जुनगिरी, गणेश मानकर, भगवान शेगोकार, एकनाथ सपकाळ, दामोदर सपकाळ, रमाकांत सुपे, संजय शेंडे आणि दुर्गादास जोशी यांना एलईडी दिव्यांचे वितरण करण्यात आले.