भाडेतत्त्वावरील वर्गखोल्या परत घेणार!
By Admin | Updated: November 25, 2015 02:04 IST2015-11-25T02:04:24+5:302015-11-25T02:04:24+5:30
बुलडाणा जिल्हा परिषदेने शाळांमधील काही वर्ग खोल्या खासगी शैक्षणिक संस्थांना भाडेतत्त्वावर दिल्या होत्या.

भाडेतत्त्वावरील वर्गखोल्या परत घेणार!
बुलडाणा: जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिनियम धाब्यावर बसवून बुलडाणा जिल्हा परिषदेने आपल्या मालकीच्या शाळांमधील काही वर्ग खोल्या खासगी शैक्षणिक संस्थांना भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. शिक्षण समितीने ठराव घेऊन या खोल्या भाड्याने दिल्या होत्या; मात्र लेखा परीक्षणात ही कृती नियमबाहय़ असल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आली आहे. या सर्व वर्ग खोल्या खाली करण्याबाबत संबंधित संस्थांना शिक्षण विभागाने नोटीस बजावल्या आहेत. बुलडाणा मुख्यालयाच्या जवळच असलेले देऊळघाट, रायपूर, धाड व साखळी बु. या गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील काही खोल्या खासगी शैक्षणिक संस्थांना भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. जून २0१0 पासून हा भाडेपट्टा नाममात्र दराने सुरू असून, या संस्था जिल्हा परिषद वतरुळातीलच काही पदाधिकार्यांच्या प्रभावात आहेत त्यामुळे शिक्षण समितीने ठराव घेऊन संबंधित संस्थांना वर्ग खोल्या भाड्याने दिल्या होत्या. वास्तविक जिल्हा परिषदेची मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्यासाठी म.रा. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ अन्वये कलम १२८ ब २ नुसार सक्षम प्राधिकार्याची मंजुरी किंवा सर्वसाधारण सभेपुढे हा विषय ठेवणे आवश्यक होते. लेखा परीक्षणात ही बाब समोर आल्यामुळे शिक्षण विभागाला जाग आली असून, या वर्ग खोल्या तत्काळ खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रायपूर येथील संस्थेने याबाबत कार्यवाही पूर्ण केल्याची माहिती असून, इतर संस्थांना ६ नोव्हेंबर रोजी आदेश बजावूनही कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी या संदर्भात शिक्षण विभागाला वर्ग खोल्या खाली करण्याबाबत तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शिक्षण विभागाने संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना कामाला लावले असून, कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.