लर्निंग लायसन्स मिळणार ऑनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:33 IST2021-09-13T04:33:28+5:302021-09-13T04:33:28+5:30
बुलडाणा : परिवहन विभागाने नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी पेपरलेस कामावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार विभागाच्या बऱ्याच सुविधा ऑनलाइन करण्यात आल्या ...

लर्निंग लायसन्स मिळणार ऑनलाइन
बुलडाणा : परिवहन विभागाने नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी पेपरलेस कामावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार विभागाच्या बऱ्याच सुविधा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. आता यामध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) सुविधेची भर पडली आहे. आधार क्रमांकाचा वापर करून शिकाऊ अनुज्ञप्ती ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहे.
या प्रक्रियेन्वये आधार क्रमांकातील नाव, पत्ता व फोटोग्राफ डेटाबेसमधून स्वयंचलीतरीत्या घेण्यात येतो. मात्र, नमुना १ (अ) मधील वैद्यकीय प्रमाणपत्र नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावे लागत आहे. नागरिकांचे कार्य पेपरलेस होण्याकरिता एनआयसीद्वारे नमुना क्रमांक १ मधील वैद्यकीय प्रमाणपत्र अर्हता प्राप्त डॉक्टरांकडे ऑनलाइन पद्धतीने करून अपलोड करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. मोटार वाहन कायदा कलम ८ अन्वये वैद्यकीय प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबत व केंद्रीय मोटार वाहन नियम ५ मध्ये त्याची अनिवार्यता निश्चित केलेली आहे.
शासनाने १३ सप्टेंबर २०१३ च्या आदेशान्वये नमुना क्रमांक १ मधील वैद्यकीय प्रमाणपत्र केवळ एमबीबीएस पदवी धारण करणारे डॉक्टर्स देऊ शकतील, असे निर्देशित केले आहे. ऑनलाइन शिकाऊ अनुज्ञप्तीची प्रक्रिया पेपरलेस होण्याकरिता नमुना क्रमांक १ मधील वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने अपलोड होणे अनिवार्य आहे. कार्यक्षेत्रातील एमबीबीएस पदवी धारण करणारे डॉक्टर्स यांची एमबीबीएस पदवी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचे प्रमाणपत्र, क्लिनिकचे किमान चार छायाचित्र, कुठलेही एक ओळखपत्र आदी कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
डॉक्टरांना मिळणार स्वतंत्र युजर आयडी
कार्यक्षेत्रातील कागदपत्रे आपलोड केलेल्या प्रत्येक एमबीबीएस डॉक्टरला स्वतंत्र युजर आयडी देण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांनी लॉग इन करून अर्जदारांची नियमाप्रमाणे आवश्यक शारीरिक तपासणी करून नमुना क्रमांक १ (अ) त्यांच्या स्तरावरून प्रमाणित करून तो अपलोड करणे आवश्यक आहे. तरी युजर आयडी प्राप्त करण्यासाठी इच्छुक एमबीबीएस डॉक्टरांनी सर्व मूळ कागदपत्रे तपासणीकरिता कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोपाल वरोकार यांनी केले आहे.