प्रत्येक महिलेत नेतृत्वक्षमता- सिंधुताई सपकाळ
By Admin | Updated: April 13, 2017 01:21 IST2017-04-13T01:21:07+5:302017-04-13T01:21:07+5:30
मलकापूर- आज प्रत्येक महिलेत कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करण्याची कुवत निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन अनाथांच्या मायी डॉ.सिंधूताई सपकाळ यांनी केले.

प्रत्येक महिलेत नेतृत्वक्षमता- सिंधुताई सपकाळ
मलकापूर : प्रतिकुल व खडतर परिस्थितीतही महिलांनी न डगमगता कणखर बाण्याने वागले पाहिजे. प्रत्येक महिला ही माता सावित्रीची लेक असून, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ तिच्यात आहे अन् हे बळच प्रत्येकीत सावित्रीबाई फुलेंच्या शैक्षणिक लढ्यातून उभे राहिले आहे. त्यांच्या लढ्यामुळेच आज प्रत्येक महिलेत कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करण्याची कुवत निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन अनाथांच्या मायी डॉ.सिंधूताई सपकाळ यांनी केले.
महात्मा जोतिराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त शहरातील स्वामी विवेकानंद आश्रम येथे डॉ.सिंधूताई सपकाळ संस्कारक्षम व्याख्यान अंतर्गत संबोधित होत्या.
व्याख्यानपूर्वी बहुजन उद्धारक सेवा समितीच्यावतीने महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून शोभायात्रा काढण्यात आली. प्रारंभी महामानवांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. या शोभायात्रेत भजनी मंडळ व विश्व हिंदू परिषद संचालीत रणरागिणी महिला ढोल पथक सहभागी झाले होते. यानंतर सायंकाळी ७ वाजता डॉ.सिंधूताई सपकाळ यांच्या व्याख्यानाला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान त्यांनी महिलांना मार्गदर्शन करीत समाजजीवनातील विविध पैलुंवर प्रकाश टाकीत मनात आणलं तर महिला काहीही करु शकतात अन् हे केवळ आत्मविश्वासावरच निर्भर आहे, असे स्फुरणदायी मार्गदर्शन त्यांनी केले.
याप्रसंगी शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळीसह माता व भगिनी उपस्थित होत्या.