पोषण आहारात अळ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2016 01:41 IST2016-01-11T01:41:29+5:302016-01-11T01:41:29+5:30
वडगावतेजन येथील अंगणवाडी केंद्रातील धक्कादायक प्रकार; मटकीमध्ये आढळल्या अळ्या.

पोषण आहारात अळ्या!
वडगावतेजन (जि. बुलडाणा): येथील अंगणवाडी केंद्र क्र. २ मध्ये विद्यार्थ्यांंंच्या पोषण आहारातील मटकीमध्ये अळ्या तसेच आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे वास्तव शनिवारी समोर आले. त्यामुळे विद्यार्थ्यांंंचे आरोग्य धोक्यात आले आहे. वडगाव तेजन येथील अंगणवाडी क्र. २ मध्ये अळ्या व भुंगे लागलेला निकृष्ट दर्जाचा आहार असल्याचा प्रकार ग्रामस्थांना आढळला. त्यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती आशाताई झोरे व लोणार कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती शिव तेजनकर यांना सदर प्रकार सांगितला. दरम्यान, आशाताई झोरे व शिव तेजनकर यांनी तात्काळ अंगणवाडीस भेट देऊन पाहणी केली. अंगणवाडीतील आहारामध्ये अळ्या व निकृष्ट दर्जाचे धान्य असल्याची पुष्टी त्यांनी केली. त्याचबरोबर अंगणवाडीमध्ये लाभार्थी १७ विद्यार्थ्यांंंची नोंद आहे; मात्र ५१ मुलांचा आहार बोलविला जात असल्याचेही वास्तव यावेळी समोर आले. १३ ऑक्टोबरपासून पर्यवेक्षिकेने अंगणवाडीला भेट दिली नाही व अंगणवाडी वेळेवर भरत नसल्याचे यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले. विनोद तेजनकर, शिव पाटील तेजनकर, रमेश तेजनकर, भारत सिरसाट, राजेश जाधव, विष्णू सिरसाट, रामेश्वर तेजनकर, शिवाजी सिरसाट, शिवाजी सरदार, अच्युतराव सिरसाट, अनिल आनंदराव, संजाब शेजुळ, सुरेश जाधव, विजय मापारी, मधुकर तुपकर, सुभाष लोढे, राजेश तेजनकर, शिवाजी जाधव, संजय लोढे, बबन खरात, मिलिंद सिरसाट, शालिक तेजनकर, संतोष जाधव आदी ग्रामस्थ यावेळी हजर होते.