भाजीत निघाल्या अळ्या !
By Admin | Updated: November 19, 2014 01:05 IST2014-11-19T01:05:40+5:302014-11-19T01:05:40+5:30
खामगाव येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहामधील घटना.

भाजीत निघाल्या अळ्या !
खामगाव (बुलडाणा): येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थी जेवण करीत असताना काही विद्यार्थ्यांना वांग्याच्या भाजीत अळ्या दिसून आल्या. यानंतर ही भाजी फेकून देत वादावर पडदा टाकण्यात आला. ही घटना आज १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १0.३0 वाजेच्या सुमारास घडली.
खामगाव येथील गो.से. महाविद्यालयाच्या पाठीमागे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. येथे ११0 विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली असून, शैक्षणिक सत्र संपेपर्यंत वसतिगृह सुरु असते. वसतिगृहातील प्रत्येक विद्यार्थ्यांना दरमहा ५00 रुपये वैयक्तिक खर्चासाठी मिळतात. प्रतिविद्यार्थ्याच्या जेवणाकरिता प्रतिमाह ३३00 रुपये दिले जातात. सद्यस्थितीत हे वसतिगृह गणेशपूर येथील आदिवासी महिला बचत गटामार्फत कंत्राट पद्धतीने चालविले जात आहे. बचत गटाच्या सविता धंदर या कंत्राट चालवितात. विद्यार्थ्यांना दररोज वरण, भात, भाजी, पोळी, सकाळी दूध, फळे, नाश्ता तसेच आठवड्यातून एक दिवस नॉनव्हेज दिले जाते. आज मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी नित्यानियमाने जेवण करीत असताना गोकुल चव्हाण व सुबोध राठोड या विद्यार्थ्यांना वांग्याच्या भाजीत अळ्या असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी तत्काळ वसतिगृह अधीक्षक ए.के.बोरकर यांना तत्काळ ही घटना निदर्शनास आणून दिली. यानंतर सदर भाजी फेकून दुसरी भाजी देण्यात आली. या घटनेमुळे विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला.