समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदीचा वेग वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 01:01 IST2018-03-07T01:01:44+5:302018-03-07T01:01:44+5:30
समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदीत तफावत होत असल्याचे आरोप खा. प्रतापराव जाधव यांनी केला असून, या प्रश्नी ६ मार्च रोजी त्यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन देऊळगाव राजा आणि मेहकर तालुक्यातील ही तफावत दूर करावी, अशी मागणी केली आहे

समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदीचा वेग वाढला!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्य सरकारच्या प्लॅगशीप प्रोग्रामपैकी एक असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम आता अधिक वेगात होणार असून, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांची जवळपास ७४१ हेक्टर अर्थात जवळपास ५९ टक्के जमीन खरेदी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान, यापोटी शेतकºयांना ४७१ कोटी ४४ लाख रुपयांचा मोबदला दिला गेला आहे. दुसरीकडे या महामार्गासाठी जमीन खरेदीत तफावत होत असल्याचे आरोप खा. प्रतापराव जाधव यांनी केला असून, या प्रश्नी ६ मार्च रोजी त्यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन देऊळगाव राजा आणि मेहकर तालुक्यातील ही तफावत दूर करावी, अशी मागणी केली आहे.
डिसेंबर महिन्यात समृद्धी महामार्गासाठी प्रतिदिन २५ हेक्टर जमीन खरेदीचे लक्ष्य जिल्हा प्रशासनाने निश्चित केले होते. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकाºयांना निर्देशही दिले होते. भूमी अभिलेख कार्यालयाने जमीन संपदनासंदर्भात मोजणीची असलेली मोठी अडचण दूर करण्यासाठी मैदानात उडी मारली होती; मात्र अपेक्षित वेग यंत्रणेला राखता आला नव्हता. खातेफोड, एकत्रीकरणाची अडचण, सात-बारामधील चुकांमुळे जमीन संपादनाचा वेग मंदावला होता. त्या उपरही ५ मार्चअखेर जिल्हा प्रशासनाने समृद्धी महामार्गासाठी ९ डिसेंबरच्या २०१७ च्या तुलनेत दुपटीने जमीन संपादित केली आहे. या रस्त्यासाठी प्रत्यक्षात १ हजार २५७ हेक्टर जमीन संपादित करावायची असून, आजच्या तारखेत ७४१ हेक्टर जमीन संपादित झाली आहे. त्याची टक्केवारी ५९ टक्के आहे. जिल्ह्यात ८७.२९ किमी लांबीचा हा रस्ता आहे.
प्रत्यक्ष कामास मात्र विलंब!
फेब्रुवारीअखेर जिल्ह्यातील या रस्त्याच्या कामास प्रारंभ होणार होता. निर्धारित लक्ष्याप्रमाणे प्रत्यक्षात जिल्ह्यात रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला नसल्याचे चित्र आहे. मेहकर तालुक्यातील डोणगावपासून ते देऊळगाव राजा तालुक्यातील गोळेगावपर्यंत बुलडाणा जिल्ह्याच्या हद्दीतून हा महामार्ग जात असून, त्याची लांबी ८७.२९ किमी आहे. आता प्रशासकीय यंत्रणा जिल्ह्यातील भूसंपादनाचे काम वेगाने व्हावे, यासाठी जोर लावत आहे. त्यातूनच हा वेग वाढत आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची जाधवांनी घेतली भेट
या प्रश्नी खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट मुंबई गाठून थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबतची माहिती दिली. सोबच मेहकर तालुक्यातील फैजलापूर हे गाव पैनगंगेच्या नदीतीरावर असून, तेथे ऊस, केळी यासारखी बागायती पिके गेल्या २० वर्षांपासून घेतली जात असल्याने राज्यमंत्र्यांच्या त्यांनी निदर्शनास आणून दिले. याप्रकरणी कागदपत्रांची खातरजमाही करण्याचे त्यांनी सूचित केले आहे. यासोबतच अन्य कागदपत्रेही उपलब्ध करून दिली आहेत. या प्रश्नी आपण चर्चा करू, असेही ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.
जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात तफावत
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेडराजा आणि देऊळगावराजा तालुक्यातून हा मार्ग जात आहे; मात्र या मार्गासाठी जमीन खरेदी-विक्री करतानाच्या दरामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप खुद्द खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. मेहकर तालुक्यातील बेलगाव, चायगाव, शिवपुरी आणि देऊळगाव राजा तालुक्यातील तुळजापूर येथील शेतकºयांना रेडीरेकनर व बाजार भाव कमी असल्यामुळे मोबदला कमी दराने मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे या गावामधील खरेदी-विक्री व्यवहार विचारात न घेता शेजारील लगतच्या गावातील दर लागू केल्यास शेतकºयांना योग्य मोबदला मिळू शकतो, असे खा. जाधव यांचे म्हणणे आहे.