ब-हाणपूरच्या नगर निगम अध्यक्षपदी बुलडाणा जिल्ह्याची लेक
By Admin | Updated: December 8, 2014 01:24 IST2014-12-08T01:24:56+5:302014-12-08T01:24:56+5:30
मध्यप्रदेशात महाराष्ट्राचा झेंडा : गौरी शर्मा यांचा सन्मान.

ब-हाणपूरच्या नगर निगम अध्यक्षपदी बुलडाणा जिल्ह्याची लेक
बुलडाणा : मध्यप्रदेशातील बर्हाणपूर नगर निगममध्ये बुलडाणा जिल्ह्यच्या दोन व्यक्तींचे वर्चस्व राहिल्याने जिल्ह्याचा मान वाढला आहे. संग्रामपूर तालुक्यातील अनिल भोसले ४ डिसेंबर रोजी महापौर म्हणून निवडले गेले, तर २00९ पासून याच नगर निगमच्या अध्यक्षपदी (स्पीकर) शेगावच्या गौरी दिनेश शर्मा या कारभार पाहत आहेत. विशेष म्हणजे, गौरी शर्मा काँग्रेसकडून, तर भोसले भाजपच्या वतीने बर्हाणपूर शहराची धुरा सांभाळत आहेत, ही गौरवास्पद बाब म्हणावी लागेल. त्यांच्या विजयाचा जेवढा आनंद बर्हाणपुरातील जनतेला आहे, तेवढाच या भागातील नागरिकांमध्येही दिसून येत आहे.
गौरी शर्मा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता, त्यांनी मेहकरजवळील कळमेश्वर हे माहेर, तर शेगाव सासर आहे. त्यांचे पती दिनेश शर्मा बर्हाणपूर येथे केळीचे व्यावसायिक आहेत. २00९ मध्ये काँग्रेस पक्षाकडून गौरी शर्मा ह्या वॉर्ड मेंबर म्हणून निवडून आल्या. एकूण ४८ पैकी २४ जागी काँग्रेसचे वॉर्ड मेंबर निवडून आल्याने आज या नगर निगममध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये योगायोगाने आता बनलेले महापौर भोसले आणि गौरी शर्मा यांच्यात चुरस होती. गौरी शर्मा अध्यक्ष झाल्या व भोसले पराभूत झाले होते. तेच भोसले जनतेने निवडलेले महापौर झाले. एकच जिल्ह्यातील दोन व्यक्ती मध्यप्रदेशातील बर्हाणपूर येथे वास्तव्यास असून, लोकप्रिय ठरल्या आहेत. म्हणूनच मोठय़ा शहराच्या कारभाराची धुरा त्यांच्याकडे लोकांनीच दिली आहे. महापौर आणि अध्यक्ष अशी दोन्ही महत्वाची पदे बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी राहिलेल्या व्यक्तीच्या पदरात असल्याने हा जिल्ह्यासह महाराष्ट्राचा मान म्हणावा लागेल!