कार्यालयासमोर वाहनतळांचा अभाव
By Admin | Updated: August 11, 2015 23:25 IST2015-08-11T23:25:29+5:302015-08-11T23:25:29+5:30
लोणार शहरात वाहतुकीची कोंडी

कार्यालयासमोर वाहनतळांचा अभाव
लोणार (जि. बुलडाणा): शहरातील सर्वच शासकीय कार्यालये, बँका, पतसंस्था आदी कार्यालयांपुढे वाहनतळाची सुविधाच नसल्याने कामानिमित्त येणार्यांना कार्यालयासमोर अस्तव्यस्त उभ्या होणार्या शेकडो वाहनांमधून आत जाण्याचा मार्ग शोधावा लागतो. वाहनतळ नसल्याची स्थिती सर्वत्र सारखीच असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्नही शहरात निर्माण होत आहे. शहरातील प्रत्येक शासकीय कार्यालय तसेच बँकेत कार्यरत कर्मचार्यांजवळ दुचाकी असल्यामुळे कार्यालय तेथे वाहनतळाची सुविधा असणे गरजेचे आहे; मात्र याकडे सर्वच कार्यालये तसेच बँकांच्या व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याने कार्यालयातील कार्यरत कर्मचारी मनात येईल त्या ठिकाणी आपली वाहने पार्क करतात. दरम्यान, एखाद्या वाहनास धक्का लागल्यावर चिकटून लागलेली वाहने एकमेकांवर पडतात. यामध्ये एखाद्या वाहनाचे नुकसान झाल्यास संबंधित नागरिकांकडून वाहनाची नुकसानभरपाईही वसूल केली जाते. शहरातील स्टेट बँक, विदर्भ कोकण, बुलडाणा अर्बन, खामगाव अर्बन बँकेच्या शाखेमध्ये दैनंदिन व्यवहारासाठी येणार्या ग्राहकांची संख्या हजारोंच्या घरात असून, बँकांसमोर वाहनतळाची सुविधा नसल्याने ग्राहकांना रस्त्यावरच आपली वाहने उभी करावी लागतात. यामुळे शहरात बरेचदा वाहतूककोंडीही होते. त्यातून अनेक वेळा अपघातही होतात.