बुलडाणा: तालुका व शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनू पाहत असताना बुलडाणा शहरासह लगतच्या सेमी अर्बन भागातील सुमारे दीड लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी महसूल, पालिका प्रशासनाने लसीकरण केद्रासाठी पाच जागा शोधल्या आहेत. मात्र डॉक्टरांचीच कमतरता असल्याने ही लसीकरण केंद्र सुरू होत नसल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे बुलडाणा शहर परिसरातच आता कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता बुलडाणा शहरासह लगतचा सेमी अर्बन भाग असलेल्या सुंदरखेड, सागवन, सावळा, जांभरून या भागात लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे. मात्र प्रयत्न करूनही त्यात यश येत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बुलडाण्यासाठी अन्य तालुक्यातून उपलब्ध होत असलेले लसीकरणाचे अतिरिक्त डोस हे तालुक्यातील ग्रामीण भागात पाठविण्याची वेळ आली आहे. आरोग्य विभागातील काही डॉक्टर व कर्मचारी हे याकामासाठी पूर्णवेळ देत नसल्याचीही ओरड आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बुलडाणा शहर व ग्रामीण भागातील लसीकरणाचे कामही जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पाहात आहे. मुळातच या पाच केंद्रांसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे वैद्यकीय अधिकारी व तत्सम आरोग्य कर्मचारीच उपलब्ध नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने याबाबत नियोजन करून त्वरित ही केंद्रे सुरू करण्याची मागणी आ. गायकवाड यांनी केली आहे.
--आ. गायकवाडांची डीएअेांशी चर्चा--
आ. संजय गायकवाड यांनी बुलडाणा शहरासह लगतच्या सेमीअर्बन भागात लसिकणाचा वेग वाढविण्यास प्राधान्य देण्याची भूमिका मांडली असून तहसिलदार रुपेश खंडारे, पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे, ठाणेदार प्रदीप साळुंके यांच्याशीही यासंदर्भात चर्चा केली. त्यांचे बुलडाण्यातील नियोजन पाहल्यानतंर प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. जे. सांगळे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. सोबतच लसीकरण मोहिमेत सहभागी जि. प. चे डॉक्टर दोन तासांच्यावर सेवा देत नसल्याबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.