शिकारी उठले आता खारूताईंच्या जिवावर!
By Admin | Updated: April 22, 2016 02:24 IST2016-04-22T02:24:03+5:302016-04-22T02:24:03+5:30
शिकारी टोळय़ा सक्रिय; वन्यजीव विभाग मात्र अनभिज्ञ.

शिकारी उठले आता खारूताईंच्या जिवावर!
संतोष आगलावे / बोरखेड (जि. बुलडाणा)
लोकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी इतर वन्य प्राण्यांसोबतच आता खारूताईंचीही शिकार मोठय़ा प्रमाणात केली जात आहे. या गरीब जिवावर उठलेल्या शिकारींची टोळी परिसरात सक्रिय झाली असून, वन्यजीव विभाग यापासून अनभिज्ञ आहे.
संग्रामपूर तालुक्यातील सगोडा परिसरात ससा, तितर, बटेर आणि रानडुकरांची कत्तल होणे हे नित्याचेच आहे; मात्र आता चक्क खारूताईंची कत्तल होताना दिसत आहे. हा संतापजनक प्रकार करणारी पाच ते सहा शिकारींची टोळी या परिसरात सक्रिय झाली आहे. खारूताईला पकडण्यासाठी प्रत्येक शिकार्याजवळ पाच ते सहा छोटे पिंजरे असतात. चिंच, बाभूळ, कडुनिंब आदी झाडांच्या बुंध्याशी हे शिकारी पिंजरे ठेवतात. त्या पिंर्जयावर पोळीचा तुकडा ठेवतात. पोळीच्या वासाने खारूताई पिंर्जयाजवळ येते. तुकडा तोंडात घेताबरोबर, पिंजर्यातील स्प्रिंग सटकून तिच्या मानेवर त्याचा फटका बसतो आणि या चिमुकल्या जिवाचा जागेवरच मृत्यू होतो.
एक शिकारी दिवसभरात १0 ते १२ खारूताईंची शिकार करतो. एका खारूताईचे वजन साधारणत: २५0 ते ३00 ग्रॅम असते. त्यातून १५0 ग्रॅम खाण्यायोग्य मांस मिळते. दिवसभर एका शिकार्याजवळ खारूताईचे दीड किलो मांस जमा होते.