कासारखेडवासियांचा मतदानावर बहिष्कार
By Admin | Updated: October 7, 2014 00:02 IST2014-10-06T23:42:37+5:302014-10-07T00:02:21+5:30
मेहकर मतदारसंघातील कासारखेडा येथील रस्त्याचे डांबरीकरण अद्याप दुर्लक्षीत.

कासारखेडवासियांचा मतदानावर बहिष्कार
कळंबेश्वर (बुलडाणा) : मेहकर मतदारसंघातील कासारखेड हे डांबरीकरण रस्त्याच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे कासारखेडवासियांनी १५ ऑक्टोबर रोजी होणार्या विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सन १९९७ पासून पेनटाकळी प्रकल्पांतर्गत पुनर्वसन झालेल्या कासारखेड ग्रामवासियांना लव्हाळा-मेहकर या रस्त्यासोबत जोडण्याच्या आश्वासनावरच ठेवण्यात आले. परंतु प्रत्यक्षात १६ वर्षापासून एकदाही या रस्त्यासंदर्भात ठोस पाऊल न उचलल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. विद्यार्थ्यांना विवेकानंद विद्यालय हिवराआश्रम येथे शिक्षणासाठी जावे लागते. तर कासारखेड येथील ग्रामस्थांना शेतमाल खरेदीविक्रीसह इतर विविध कामांकरीता मेहकरला जावे लागते. परंतु येथील रस्ता डांबरीकरण नसल्याने गावकर्यांच्या अडचणीचे होऊन बसले आहे. त्यामुळे कासारखेड ग्रामस्थांनी विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात जिल्हाधिकार्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदनावर उपसरपंच मोहन आनंदा राठोड यांच्यासह १४३ ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या आहेत.