खावटी अनुदान व अन्नधान्य किटचे टिटवी येथे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:36 IST2021-08-26T04:36:25+5:302021-08-26T04:36:25+5:30
लोणार : जिल्ह्यातील आदिवासी समाज कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये हाताला काम नसल्यामुळे उपाशी राहू नये यासाठी शासन स्तरावरून आदिवासी ...

खावटी अनुदान व अन्नधान्य किटचे टिटवी येथे वाटप
लोणार : जिल्ह्यातील आदिवासी समाज कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये हाताला काम नसल्यामुळे उपाशी राहू नये यासाठी शासन स्तरावरून आदिवासी समाजाला खावटी अनुदान व अन्नधान्य देण्यात येत असते. मागील दीड वर्षापासून अनुदानाची घोषणा करण्यात आली होती. परंतु आदिवासी समाज अनुदानाच्या प्रतीक्षेत होता. बिरसा मुंडा क्रांती दल जिल्हाध्यक्ष भगवानराव कोकाटे यांनी आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना २ ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे खावटी अनुदान मिळावे यासाठी मागणी केली होती. याची दखल घेत जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी या खावटी अनुदानाचे वाटप करण्यात आले.
लोणार तालुक्यामध्ये टिटवी, गोत्रा, रायगाव, मढी, पहूर, दाभा, खुरामपूर, शारा या भागात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. लोणार तालुका टिटवी येथे भगवानराव कोकाटे यांच्या हस्ते ५८ आदिवासी समाज बांधवांना त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये रोख व दोन हजार रुपयांचे अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. या अन्नधान्याच्या किटमध्ये हरभरा दोन किलो न मूग तीन किलो, मिरची एक किलो, मसाला ५०० ग्रॅम, चहापत्ती ५०० ग्रॅम, चवळी दोन किलो, उडीद डाळ एक किलो, साखर तीन किलो, मटकी एक किलो, खाद्यतेल ८०० ग्रॅम, तूरडाळ एक किलो, ९०० ग्रॅम वाटाणा अशी १९ किलोची किट टिटवी येथे वाटप करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील ८५०० आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना खावटी अनुदान व अन्नधान्य किट अनुदान मंजूर झाले. ज्यावेळी ज्ञानेश्वर डोळे, उपसरपंच एकनाथ घाटे, आधी आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.