खरीप पिकांनी माना टाकल्या

By Admin | Updated: July 10, 2015 00:01 IST2015-07-10T00:01:42+5:302015-07-10T00:01:42+5:30

जानेफळ येथील शेतक-यांना दमदार पावसाची प्रतीक्षा.

Kharif crops considered | खरीप पिकांनी माना टाकल्या

खरीप पिकांनी माना टाकल्या

सय्यद साबीर/जानेफळ : पावसाने गेल्या १५ दिवसांपासून लंबी दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. दुपारच्यावेळेला उन्हाळ्याप्रमाणे उन्ह तापत असल्याने खरीप पिकांनी माना टाकल्या आहेत. बहुतांश भागातील पिके सुकण्याच्या मार्गावर असल्याने शेतकर्‍यांना दमदार पावसाची प्र तीक्षा लागली आहे.
मॉन्सूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचे आगमन होऊन सलग दोन आठवडे समाधानकारक पाऊस झाला. त्यामध्ये परिसरातील नदीनाले दुथडी वाहू लागले. दरम्यान मृग नक्षत्रातच पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शेतकर्‍यांनी मोठय़ा लगबगीने १५ ते २0 जूनपर्यंत खरीप हंगामाची पेरणी केली. बर्‍याच वर्षानंतर मृग नक्षत्रात पेरणी झाल्याने मूग, उडीदाचा पेरासुद्धा जानेफळ परिसरात झाला; परंतु गत १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामाच्या पिकांनी माना टाकल्या आहेत. पेरणीनंतर जमिनीत असलेल्या ओलीवर पीक अंकुरुन जोमाने डोलू लागले; परंतु दुपारच्या वेळेला उन्हाळ्याप्रमाणे उन्ह तापत असल्याने खरीप पिकांना या उन्हाचा फटका बसत आहे. खरीप हंगामावर निसर्गाची अवकृपा राहत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सकाळच्या सुमारास ढगांची दाटन आकाशात होत असली तरी दिवस मावळ तीला जाताना मात्र कोरडाच जात आहे. वेदशाळेने वर्तविलेले पावसाचे अंदाजही फोल ठरत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी आता पावसासाठी मंदिरामध्ये साकडे घालण्याकडे कल धरला आहे. पावसाअभावी पिके सुकत असल्याने तसेच परिसरात दुष्काळाचे ढग निर्माण झाल्याने जानेफळ येथील आठवडी बाजारातही शुकशुकाट दिसून येत आहे. या दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट बाजारपेठेवर दिसून येत आहे. पावसाने मारलेल्या दांडीमुळे हजारो रुपयांची बी-बियाणे व रासायनिक खते मातीतच जातात की काय, या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

 

Web Title: Kharif crops considered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.