खांडेभराड यांच्या ‘पोतराज’ने दिला व्यसनमुक्तीचा संदेश
By Admin | Updated: May 26, 2015 02:23 IST2015-05-26T02:23:02+5:302015-05-26T02:23:02+5:30
बुलडाणा येथे कलांगण कार्यक्रमाला प्रतिसाद.

खांडेभराड यांच्या ‘पोतराज’ने दिला व्यसनमुक्तीचा संदेश
बुलडाणा : महाराष्ट्र राज्य सरकारच्या सांस्कृतिक कला संचालनालय, मुंबई यांच्यातर्फे आयोजित कलांगण या कार्यक्रमाचे पाचवे पुष्प गुंफताना तालुक्यातील चिखला येथे शाहीर खांडेभराड यांनी पोतराज या पारंपरिक लोककलेचे सादरीकरण केले. या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधेश्याम चांडक होते. यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे पाठविण्या त आलेला माहितीपट दाखविण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तींबद्दल उ पयुक्त माहिती दाखविण्यात आली. औरंगाबाद येथील जय साई नटराज सांस्कृतिक संस्थेतर्फे लोककलेच्या क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शाहीर खांडेभराड आणि त्यांच्या चमूने आपली लोककला सादर केली. यामध्ये त्यांनी पोतराज आणि गोंधळ इत्यादी लोककलेचे प्रकार सादर केले. पोतराजच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून सांगितले. शहरीकरणामुळे खेडेगाव ओस पडत आहेत त्यामुळे लोकांना खेड्यांकडे वळवण्यासाठी जनजागृती झाली पाहिजे असाही संदेश त्यांनी दिला. लोककलेच्या सादरीकरणानंतर बुलडाणा शहरातील डी. चंद्रकांत यांनी पपेट शो अर्थात बाहुल्यांचा खेळ दाखविला. या अतिशय दुर्मीळ झालेल्या कलाप्रकाराचा आनंद बुलडाणेकर रसिक प्रेक्षकांना घेता आला. त्याचबरोबर बुलडाणा शहरातदेखील अशी कला जपणारे कलावंत आहेत याचीही जाणीव उपस्थित प्रेक्षकांना झाली. त्यानंतर बुलडाणा येथील गायक रमेश आराख यांच्या संचाने देशभक्तीपर समूहगान सादर केले. कलांगण कार्यक्रमाच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे पोलीस बॅन्ड पथकाच्या राष्ट्रगीत सादर करण्यात आले.