खामगाव मुख्याधिका-यांना बांगड्यांचा अहेर !
By Admin | Updated: July 31, 2015 23:06 IST2015-07-31T23:06:08+5:302015-07-31T23:06:08+5:30
नागरिकांचा पालिकेवर मोर्चा

खामगाव मुख्याधिका-यांना बांगड्यांचा अहेर !
खामगाव (जि. बुलडाणा) : शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील विविध समस्यांसह एका शैक्षणिक संस्थेच्या आवार भिंतीचे अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे, या मागणीसाठी वारंवार निवेदन देऊनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने संतप्त महिलांनी शुक्रवारी मुख्याधिकार्यांना घेराव घातला. यावेळी काही संतप्त महिलांनी मुख्याधिकार्यांच्या टेबलवर बांगड्याही भिरकावल्या. यामुळे शुक्रवारी दुपारी पालिकेत चांगलीच खळबळ उडाली होती. प्रभाग क्रमांक १ मधील मादन प्लॉट भागातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह परिसरातील विविध समस्यांचे निवेदन नगर पालिकेकडे अनेकदा सादर केले. यामध्ये परिसरातील एका शैक्षणिक संस्थेद्वारे अतिक्रमण करून आवारभिंत बांधल्या जात आहे. तसेच रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण केले जात आहे. रस्त्यासोबतच पाणी टंचाईच्या समस्येचेही निवेदन पालिका प्रशासनाला सादर करण्यात आले; मात्र यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे अखेरीस महिला आणि नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. या आंदोलनामुळे नगरपालिकेत काही काळ तणाव निर्माण झाला होता.