खामगाव- सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करात सूट!
By Admin | Updated: July 17, 2017 18:59 IST2017-07-17T18:59:11+5:302017-07-17T18:59:11+5:30
खामगाव पालिकेचा ऐतिहासिक निर्णय: शौर्य पदक प्राप्त करणाऱ्यांचाही समावेश

खामगाव- सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करात सूट!
अनिल गवई / खामगाव
संरक्षण दलातील शौर्य पदक धारकांसोबतच माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करात सूट देण्याचा ऐतिहासिक निर्णय खामगाव नगर पालिकेने घेतला आहे. मालमत्ता करात सूट देत, सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारी खामगाव नगर पालिका जिल्ह्यातील एकमेव पालिका ठरली आहे.
खामगाव नगर पालिकेतंर्गत शासनसाच्या चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग देण्यासाठी वृक्ष संगोपनाचाही कंत्राट देण्यात आला आहे. तीन वर्षांपर्यंत किमान ८० टक्के झाडांचे संगोपन न झाल्यास, संबधीत कंत्राटदाराचे देयक नाकारण्याचा ऐतिहासिक ठराव खामगाव पालिकेने याआधीच पारीत केला आहे. या महत्वपूर्ण ठरावासोबतच सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या, बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खामगाव नगर पालिकेने आणखी एक ऐतिहासिक ठराव घेतला आहे. माजी सैनिकांच्या विधवांसोबतच संरक्षण दलातील शौर्य पदक धारकांनाही मालमत्ता करातून सूट दिली जाणार आहे. यामाध्यमातून खामगाव पालिकेच्यावतीने शौर्य पदक प्राप्त करणाऱ्यांचा यथोचित गौरव होत असतानाच, देशासाठी बलिदान, सेवा देणाऱ्या सैनिकांप्रती आत्मियताही प्रकट झाली आहे. माजी सैनिकांच्या विधवांसोबतच उत्कृष्ठ कामांमुळे शौर्य पदक प्राप्त करणाऱ्या सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा ठराव नगरसेवक हिरालाल बोर्डे यांनी सभेसमोर मांडला. या ठरावाला आरोग्य सभापती राजेंद्र धनोकार यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सर्वांनुमते हा ठराव पारीत करण्यात आला आहे.
नगर पालिकेचे कोणतेही नुकसान नाही!
महाराष्ट्र शासन अधिनियम १९६५ चे कलम १०६ च्या पोट कलम (१), (२) अन्वये नगर पालिकेने विनिर्दिष्ठ करण्यात आलेल्या करापासून कोणत्याही वर्गातील मालमत्तेच्या किंवा व्यक्तीच्या संबधात सूट देवू शकते. देण्यात आलेल्या सूट मुळे, नगर परिषदेला येणाऱ्या तुटीची प्रतिपूर्ती शासनाकडून परत करता येईल. यासंदर्भात सूट देण्याचा शासनाचा अद्यादेशही आहे. त्यामुळे पालिकेच्या या निर्णयामुळे पालिकेचे कोणतेही नुकसान होणार नाही.
दिवाबत्ती तक्रारींसाठी पालिकेची हेल्पलाईन
खामगाव शहरातील स्ट्रिट लाईटसंदर्भातील तक्रारींसाठी नागरिकांना आता पालिकेत येण्याची गरज नाही. नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दिवाबत्ती संबधीत तक्रारी आता घरबसल्या करता येणार आहे. परिसरातील पथदिवे बंद असल्यास ७५१७०६०६०१/ ७५१७०४०५०१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा अतिशय चांगला ठराव सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक हिरालाल बोर्डे यांनी सभेसमोर मांडला. या ठरावाला विशेष बाब, सामाजिक जाणिव म्हणून बहुमताने मंजुरी देण्यात आली.
- अनिताताई डवरे, नगराध्यक्षा, खामगाव