खामगाव पालिकेचा शिपाई निलंबित
By Admin | Updated: July 15, 2015 00:55 IST2015-07-15T00:55:32+5:302015-07-15T00:55:32+5:30
नगराध्यक्षांनी घेतली झाडाझडती ; कर्मचा-यांवर वचक.

खामगाव पालिकेचा शिपाई निलंबित
खामगाव : नगर परिषद अधिकारी व कर्मचारी हे नगर पालिकेमध्ये वेळेवर येत नसल्याने नागरीकांची कामे लवकर होत नव्हती याचा नाहक त्रास नागरीकांना सहन करावा लागत होता. याची दखल घेत नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांनी १४ जुलै रोजी कर्मचार्यांची झाडाझडती घेतली असता मद्यप्राशन करुन आलेल्या एका शिपायाला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. कर्मचार्यांच्या मनमानी कारभाराबाबत काही नागरीकांनी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांच्याकडे तक्रारी केल्या असता त्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन सकाळी १0 वाजतापासून प्रवेश व्दाराजवळ नगर परिषद मुख्याधिकारी डि.ई. नामवाड, नगर परिषद उपाध्यक्ष वैभव डवरे, पाणी पुरवठा सभापती सरस्वतीताई खासने, बांधकाम सभापती सुनील जयपुरीया यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी व कर्मचार्यांची नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. यामध्ये नगर परिषदचे शिपाई अभिजीत एस. देशमुख हे कार्यालयीन वेळेवर न येता कार्यालयामध्ये मद्य प्राशन करून आल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना ७ दिवसांसाठी निलंबीत करण्यात आले. नगर परिषदमध्ये कार्यरत १४८ कर्मचार्यांपैकी ४८ कर्मचारी वेळेवर हजर झाले तर ५८ कर्मचारी उशिरा आले असून २८ कर्मचारी कोणतेही कारण न देता गैरहजर असल्याचे आढळून आले. तसेच १४ कर्मचारी रजेवर असून यापैकी ७ प्रतिनियुक्तीवर आहे. नगर पालिकेने कर्मचार्यांना शिस्त लावण्यासाठी हा कारवाईचा बडगा उगारला आहे.