खामगाव बाजार समिती सभापती, सचिव अटकेत

By Admin | Updated: May 7, 2017 02:23 IST2017-05-07T02:23:33+5:302017-05-07T02:23:33+5:30

इलेक्ट्रॉनिक वजनकाटे खरेदीत घोटाळा; उपसभापती, संचालकांसह सहा जणांवर गुन्हे.

Khamgaon Market Committee Chairman, Secretary Hept | खामगाव बाजार समिती सभापती, सचिव अटकेत

खामगाव बाजार समिती सभापती, सचिव अटकेत

खामगाव (जि. बुलडाणा) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक वजनकाटे खरेदीत घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाल्यावरुन सभापती, उपसभापती, सचिवासह ६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान सभापती व सचिव यांना पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित आरोपी फरार झाले आहेत.
राज्याचे पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या १९ मार्च २0११ च्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी निविदा किंवा दरपत्रक बोलावून नामांकीत कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे खरेदी करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार खामगाव बाजार समितीच्यावतीने वृत्तपत्रात जाहीर नोटीस देऊन नोव्हेंबर २0१६ मध्ये नामांकीत कंपन्यांच्या अधिकृत विक्रेत्यांकडून दरपत्रक मागविण्यात आले; मात्र यामध्ये सर्वात कमी दराचे दरपत्रक सादर करणार्‍या कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे खरेदी करण्याचे प्रावधान असताना बाजार समितीकडून प्रो. प्रा.महालक्ष्मी सेल्स यांचे ज्यादा दराचे दरपत्रक मंजूर करण्यात आले. बाजारात ७000 रुपये प्रतिनग या दराने उपलब्ध असलेले वजनकाटे बाजार समितीने तब्बल १४,४५0 रुपये प्रतिनग दराने खरेदी केले. एकूण १00 वजनकाट्यांची खरेदी करण्यात आली. यामध्ये पुरवठा होण्याआधीच ५0 टक्के रक्कम अग्रीम म्हणून देण्यात आली. विशेष म्हणजे महालक्ष्मी सेल्स हे कंपनीचे अधिकृत विक्रेते नसल्याचे व त्यांनी दिलेला पत्ता बनावट असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले आहे. यासंदर्भात बाजार समितीचे संचालक प्रकाश टिकार व अशोक हटकर यांनी ३ जानेवारी २0१७ रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांच्याकडे तक्रार केली होती. चौकशीत वरील सर्व गैरप्रकार उघडकीस आले. यामुळे खामगाव येथील सहकारी संस्थांचे सहायक निबंधक महेश कृ पलानी यांनी शनिवार ६ मे रोजी खामगाव शहर पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दिली. यावरुन शहर पोलिसांनी सभापती संतोष टाले, उपसभापती निलेश दिपके, संचालक विलास इंगळे, प्रमोद चिंचोळकर, सचिव दिलीप देशमुख व महालक्ष्मी सेल्स तर्फे प्रोप्रायटर रा. मोरगाव दिग्रस ता. शेगाव यांच्याविरुध्द भादंवि कलम १२0 ब , ४0६, ४२0, ४६५, ४६८, ४७१, ४७७ अ, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी सभापती टाले व सचिव देशमुख यांना अटक केली असून, त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. उर्वरित आरोपी फरार झाल्याची माहिती आहे.

Web Title: Khamgaon Market Committee Chairman, Secretary Hept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.