खामगाव, लोणार बसस्थानकाचा होणार कायापालट!
By Admin | Updated: December 25, 2015 03:21 IST2015-12-25T03:21:55+5:302015-12-25T03:21:55+5:30
बसस्थानकांचे होणार आधुनिकीकरण; १.८0 कोटी मंजूर.

खामगाव, लोणार बसस्थानकाचा होणार कायापालट!
बुलडाणा: जागतिक कीर्तीचे खार्या पाण्याचे सरोवर असलेल्या लोणार आणि मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्गावर असलेले व जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या खामगाव या दोन शहराच्या बसस्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. यासाठी महामंडाळाने १ कोटी ८0 लाख रुपये मंजूर केले आहेत. राज्य परिवहन महामंडळाचे बुलडाणा जिल्ह्यात सात बस डेपो आहेत तर तालुक्याच्या १३ ठिकाणी बसस्थानके आहेत. दररोज १ लाख ५0 हजार किमी ऑपरेशन होते. त्यासाठी ५१७ बसेस असून, ९६७ चालक आणि ९३२ वाहक आहेत. बुलडाणा हे जिल्ह्याचे ठिकाण वगळता इतर तालुक्याच्या ठिकाणच्या बसस्थानकांची स्थिती फारशी चांगली नाही. वाढत्या स्पर्धेच्या युगात प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एसटीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. शिवाय प्रवाशांना बसस्थानकावर अधिकाधिक सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील, याकडे एसटीने लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बसस्थानकाचे टप्प्या-टप्प्याने आधुनिकीकरण करण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे. यामध्ये प्राधान्य क्रमाने खामगाव आणि लोणार येथील बसस्थानकाची निवड करण्यात आली आहे. लोणार येथे जागतिक कीर्तीच्या खार्या पाण्याचे सरोवर असल्यामुळे येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. जगाच्या नकाशावर लोणार शहराचे नाव झळकत असले तरी लोणार शहराचा पाहिजे तसा विकास झाला नाही. एसटीने मात्र बसस्थानक अत्याधुनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रारंभी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. या निधीमधून बसस्थानकाची प्रशस्त ईमारत, प्रवाशांना बसण्यासाठी आरामदायी आसन व्यवस्था, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, सुलभ शौचालय, व्यापारी संकुल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. सदर कामास मंजुरात मिळाली असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.