Khamgaon : encroaching on drains | खामगावात नालेही अतिक्रमणाच्या विळख्यात!
खामगावात नालेही अतिक्रमणाच्या विळख्यात!

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: प्रमुख रस्त्यांसोबतच अंतर्गत नाल्या आणि मोठ्या नाल्यांना अतिक्रमणाचा विळखा आहे. शहरातील रस्त्यांवरील आणि मुख्य चौकातील अतिक्रमण काढण्यासाठी दुर्लक्ष होत असतानाच, नाल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठीही कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. त्याचवेळी शहरातील अतिक्रमण काढताना दुजाभाव केल्या जात असल्याचीही सामान्यांची ओरड आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर म्हणून खामगाव शहराचा नावलौकीक आहे. मात्र, गत काही वर्षांपासून या शहराला अतिक्रमणाचा विळखा आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढताना भेदभाव केल्या जात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण निमुर्लन करण्यात आल्यानंतर अवघ्या दोन-तीन दिवसांमध्येच आहे त्या ठिकाणीच पुन्हा अतिक्रमण जैसे थे होते. त्यामुळे पालिकेची अतिक्रमण निर्मुलन मोहिम एक फार्स ठरत असल्याचे दिसून येते.
शहरातील काही अतिक्रमणांना स्थानिक राजकीय व्यक्तीचे पाठबळ असल्याचे दिसून येते. त्यामुळे नटराज गार्डन जवळील अतिक्रमण काढताना राजकीय व्यक्तीशी निगडीत असलेल्या अतिक्रमकांचे अतिक्रमण न काढता किरकोळ विक्रेत्यांची दुकाने हटविण्यात आली. शहर पोलिस स्टेशनसमोरील अतिक्रमण हटवितानाही काही अतिक्रमकांना झुकते माप देण्यात आले. जगदंबा रोडवरील एका पाणटपरीच्या संचालकांना अतिक्रमण विभागातील एका अधिकाऱ्याचे पाठबळ आहे. त्यामुळे गत कित्येक वर्षांपासून ही पानटपरी रस्त्यातून हटविण्यासाठी कुणाचीही हिंमत होत नाही. नगर पालिका कार्यालयानजीक काही अतिक्रमणांचीही हीच परिस्थिती आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील अतिक्रमण हटवितानाही पालिका प्रशासनाकडून दुजाभाव केला जातो. रस्ता विस्तारीकरणा दरम्यान, एका हॉटेल व्यावसायिकासोबतच या रस्त्यावरील काही किरकोळ विक्रेत्यांना पक्के अतिक्रमण काढताना झुकते माप देण्यात आले होते. थोडक्यात अतिक्रमण निमुर्लनासाठी कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही. त्यामुळे मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, प्रमुख चौक, वळण मार्ग आणि नाल्यांवरही अतिक्रमण वाढत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल!
खामगाव शहरातील अतिक्रमणाचे सचित्र वृत्तांकन ‘लोकमत’मध्ये प्रकाशीत केल्या जात आहे. त्यानंतर कुंभकर्णी झोपेत असलेल्या पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील काही भागातील किरकोळ अतिक्रमण काढण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करीत खामगावात अतिक्रमण निमुर्लन मोहिम सुरू असल्याचा कांगावा केल्या जात आहे. यामाध्यमातून जिल्हाधिकाºयांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. वस्तुस्थितीत गत आठवड्यात पालिकेने शुक्रवारी शहर पोलिस स्टेशन समोरील अतिक्रमण काढले. अवघ्या तीनच दिवसांत याठिकाणचे अतिक्रमण जैसे थे झाले आहे, हे येथे विशेष!

नाल्यावर बांधकाम करून अतिक्रमण!
शहरातील रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा असतानाच प्रमुख बाजारपेठेतील नाल्यांवर पक्के बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले आहे. शहरातील एका मोक्याच्या वस्तीतील नालीवर इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, हे अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेकडून कोणतीही उपाययोजना अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही.

 

Web Title: Khamgaon : encroaching on drains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.