खामगाव बसस्थानक, रेल्वे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे!
By Admin | Updated: July 5, 2014 23:49 IST2014-07-05T22:27:45+5:302014-07-05T23:49:07+5:30
बस स्थानकावरील पोलिस मदत केंद्राला चक्क कुलूप असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

खामगाव बसस्थानक, रेल्वे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे!
खामगाव : बलात्काराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी देशपातळीवर मोठे प्रयत्न होत असतानाच, बस स्थानकावरील पोलिस मदत केंद्राला चक्क कुलूप असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे संकटात सापडल्यानंतर महिलांनी जावे तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला असून शहरातील कायदा व सुव्यस्था धोक्यात आली आहे.
बलात्कारासारख्या अनुचित घटना रोखण्यासाठी शासन स्तरावरून अनेक कायदे केल्या जात आहेत. मात्र, या घटना रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील मलकापूर येथे दोन दिवसापुर्वीच बलात्काराची घटना घडली असताना सुध्दा प्रशासन जागे झालेले नाही. मलकापुरातील घटना ही बसस्थानकावर रात्रीच्या वेळी ११ वाजता घडलेली आहे. पोलीस प्रशासनाने स्त्रियांच्या मदतीसाठी बसस्थानकात पोलीस मदत केंद्र उघडले आहे. मात्र या केंद्राकडे पोलीस नियमीत दुर्लक्ष करताना दिसतात. अनेकवेळा या केंद्रावर कोणीच नसते ते शोभेची वस्तु असल्यासारखेच आहे. खामगाव येथील बसस्थानकावर असलेल्या पोलीस मदत केंद्राला तर चक्क कुलूप लावलेले असते.
खामगावमध्ये रात्रीच्या वेळी सुध्दा लांब पल्ल्याच्या गाड्या चालु असतात. त्यामुळे नियमीत प्रवाशांची वर्दळ असते. रात्रीही या स्थानकावर पोलीस दिसत नाहीत. यामुळे मोठय़ा प्रमाणात स्त्रियांच्या जिवीताचा धोका निर्माण होतो. मलकापूर स्थानकावर पोलीस असते तर कदाचित मुलीवर ही वेळ आली नसती. येथील रेल्वे स्थानकावरही गंभीर परिस्थिती आहे. स्थानकात जाण्यासाठी मुख्य दाराची गरजच नाही. कुठूनही स्थानकावर जाता -येता येते. दारू पिणारी टोळकी बसलेली असते. रात्री १0.४0 पर्यंत येथे रेल्वे येते त्यामधून येणार्या प्रवाशांचे काय ह्यांची सुरक्षा कशी करणार? मोठा प्रश्नच आहे. या ठिकाणी २४ तास पोलिसांचा खडा पहारा असणे आवश्यक असतानाही कोणीच दिसत नाही. पोलीस असल्यास अनेक घटनांना आळा बसू शकतो.
रेल्वे स्टेशन आािण बसस्थानकावरही पोलिसांची गरज आहे. मात्र या गोष्टीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. खामगाव येथे तालुक्यातून शाळेत व महाविद्यालयात जाण्यासाठी अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनी येतात. त्यांचे सुरक्षेचे काय? बसस्थानक व रेल्वे स्टेशनवर अनेक टोळकी बसलेली दिसतात. त्यांच्याकडून मुलींना विनाकारण त्रास दिला जातो.
या विषयी त्या आपल्या आई-वडीलांना बोलायला घाबरतात. पोलीसही नाहीत अशा परिस्थितीत त्यांनी काय करायचे.
मलकापुरातील घटना ताजी असताना ती पोलिसांनी या घटनांकडे आणि सुरक्षेकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे. महत्वाच्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था असणे गरजेचे आहे. अनेकवेळा घटना घडून गेल्यावर आपल्या देशात एक प्रथा आहे की हाय अलर्ट जाहीर करण्याची पण अशा मनाला हेलावून सोडणार्या घटना काही अंतरावर जिल्ह्यात घडत असून सुध्दा प्रशासनाला जाग येत नाही.