खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 17:21 IST2019-07-24T17:21:17+5:302019-07-24T17:21:22+5:30
पणन संचालकांच्या एका आदेशाने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती तडकाफडकी बरखास्त झाली.

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनागोंदी कारभारास बुधवारी अखेर लगाम लागला. संचालकांनी वैधानिक कर्तव्यांमध्ये वारंवार दुर्लक्ष केल्याचे अधोरेखीत झाल्याने पणन संचालकांच्या एका आदेशाने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती तडकाफडकी बरखास्त झाली. या धक्कादायक प्रकारामुळे खामगावातील सहकार क्षेत्रात मोठा भूंकप झाला असून नांदुरा येथील सहाय्यक निबंधक एम.ए.कृपलानी यांची कृउबासचे नवे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
खामगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव दिलीप देशमुख यांना बाजार समितीतील वजनकाटे अपहार प्रकरणी ६ मे २०१७ रोजी पोलिसांनी अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांना न्यायालयाने प्रथम एका दिवसाची आणि नंतर ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यावेळी देशमुख सलग ४८ तासाचे वर पोलिस कोठडीत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने त्यांच्यावर कर्मचारी सेवा नियमातील तरतुदीनुसार निलंबित करणे अपेक्षीत होते. मात्र, संचालक मंडळाने देशमुख यांना पाठीशी घातले. त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. दरम्यान, याप्रकरणी नंदलाल भट्टड यांनी पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे तक्रार करीत दिलीप देशमुख यांना सेवेमधुन मुक्त करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेत पणन संचालक, पुणे यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीला दिलीप देशमुख यांचेवर कृषि उत्पन्न खरेदी विक्री नियम १९६७ मधील तरतुदीनुसार बाजार समिती कर्मचारी सेवा नियमातील तरतुदीनुसार कारवाई करून अर्जदार नंदलाल भट्टड व पणन कार्यालयाला अहवाल सादर करण्याचे सुचित केले होते. मात्र, कृउबासने याबाबत कुठलीच कारवाई केली नाही. तसेच दिलीप देशमुख यांना निलंबीत न करता त्यांचेकडून प्रभारी सचिव पदाचा पदभारही काढून घेतलेला नाही. ही बाब सेवानियमातील तरतुदीचा भंग करणारी असून सेवाजेष्ठता यादीतही मंडळाने घोळ केला आहे. नियमानुसार सेवाजेष्ठ कर्मचारी मु.शा. भिसे हे सचिव पदासाठी पात्र असताना त्यांना दिलेला पदभार काढून पुन्हा दिलीप देशमुख यांना बहाल केला. त्यामुळे बाजार समिती संचालक मंडळाने वेळोवेळी कृषि उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमांतर्गत देण्यात आलेल्या निर्देशाचे पालन न करण्याचा कसूर केला. त्यामुळे पणन संचालकांच्या एका आदेशान्वये जिल्हा उपनिबंधक, बुलडाणा यांनी खामगाव कृषि उत्पन्न बाजार समिती खामगावचे अधिक्रमण करून संचालक मंडळ बरखास्त केले आहे. तसेच सदर बाजार समितीवर एम.ए. कृपलानी, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, नांदुरा यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केलीे. प्रशासक कृपलानी यांनी बुधवारी दुपारी ३ वाजता दरम्यान, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला. त्यामुळे खामगावातील सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमन १९६३ चे कलम ४५ अन्वये पणन संचालकांनी एका आदेशाद्वारे बाजार समिती बरखास्त केली आहे. जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या आदेशान्वये बुधवारी खामगाव कृउबासचा प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला आहे.
- एम.ए.कृपलानी
प्रशासक, कृउबास, खामगाव.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनागोदी कारभार आणि भ्रष्टाचाराविरोधात दिलेल्या लढ्याला यश आले आहे. सातत्यपूर्ण आणि प्रामाणिकपणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचार खणून काढल्याचे समाधान आहे. कृषी उत्पन्न समितीचे भ्रष्टाचारी संचालक मंडळ बरखास्त झाल्याने गोर गरीब आणि शेतकºयांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- नंदू भट्टड
तक्रार कर्ते, खामगाव.
येथील कृउबासमधील अनेक गैरव्यवहार आणि अनागोंदी कारभाराबाबत वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. यांसदर्भात पणन मंत्री ना.राम शिंदे यांचेकडेही संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभाराबाबत कागदोपत्री पाठपुरावा केल्याने बाजार समितीमधील गैरव्यवहार केला. त्यामुळे शासनाने हे संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश दिले.
- अॅड. आकाश फुंडकर
आमदार, खामगाव विधानसभा मतदार संघ