खामगावातील ३0 विहिरी धोकादायक!
By Admin | Updated: January 17, 2015 00:16 IST2015-01-17T00:16:24+5:302015-01-17T00:16:24+5:30
अनेक विहिरी कठड्याविनाच, अनेक विहिरींच्या झाल्या कचराकुंड्या.

खामगावातील ३0 विहिरी धोकादायक!
गिरीश राऊत/ खामगाव (जि. बुलडाणा):
नगरपालिकेच्या ताब्यातील तसेच शहरातील सार्वजनिक असलेल्या ३५ पैकी तब्बल ३0 विहिरी धोकादायक असल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतच्या पाहणीत आढळून आले. यापैकी बहुतांश विहिरींना कठडे नसल्याचे चित्र असून, अनेक विहिरींना कचरा कुंड्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
शहरातील ३५ पैकी फक्त ५ विहिरीच वापरात आहेत, तर उर्वरित विहिरी कचरा टाकण्याचे ठिकाण होत आहे. तर काल पतंग पकडण्याच्या नादात गाळ असलेल्या विहिरीत बालक पडल्याने तसेच याआधीही न.प. रुग्णालय परिसरात असलेल्या विहिरीतील गाळ काढण्याच्या प्रयत्नात ४ तरुणांचा बळी गेल्याने या विहिरी धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याबाबत तातडीने उपाययोजना होण्याची गरज व्यक्त होत आहे. खामगाव शहरात नगर परिषदेच्या मालकीच्या सिव्हिल लाईन भागातील सप्तश्रृंगी देवी मंदिरामागील विहीर, न.प. दवाखाना परिसरातील विहीर, बालाजी प्लॉट, चांदमारी, शंकरवार हॉस्पिटलसमोर, समता कॉलनी, रायगड कॉलनी, भाजी बाजार, तसेच शहरातील जुन्या व नवीन वस्तीमध्ये अशा ३५ सार्वजनिक विहीर विविध रहिवासी भागात आहेत. मात्र शहरात नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने तसेच नवीन वस्त्यांमध्ये प्लॉटधारकांनी स्वत:च्या आवारात विहिरी खोदल्याने यापैकी फक्त ५ विहिरी वापरात असल्याचे दिसून आले. यामधील श्रीराम चौकातील विहीर, न.प. इमारतीमागील विहिरीचा वापर अग्निशमन दलासाठी होतो. तर न.प. मैदानावरील विहीर ही गणेश व देवी विसर्जनासाठी उपयोगात येते; मात्र इतर विहिरी कचराकुंड्या झालेल्या दिसून आल्या. या विहिरीत कचरा सडत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तसेच अनेक नागरिकांनी स्वत:च्या जागेत विहिरी खोदल्या आहेत. त्यामुळे त्या विहिरींचे पाणीसुद्धा यामुळे दूषित होतो; मात्र या विहिरींची गाळ काढून स्वच्छतासुद्धा होत नाही, तर सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी जाळीसुद्धा बसविण्यात आलेली नाही. संभाव्य पाणीटंचाई पाहता विहीर उपयोगात आणणे सोयीचेच ठरणार आहे. त्यामुळे नगर परिषदेने शहरातील सार्वजनिक विहिरीतील कचरा काढावा तसेच या विहिरीतील पाण्याचा उपसा करावा, अशी मागणी विहीर असलेल्या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.