७ क्विंटल ३५ किलोचा महारोठ
By Admin | Updated: February 19, 2015 00:14 IST2015-02-19T00:14:59+5:302015-02-19T00:14:59+5:30
संग्रामपूर तालुक्यातील पळशी झांशी येथील उत्सव; शंकरगिरी महाराज संस्थानमध्ये महाशिवरात्री यात्रामहोत्सव.

७ क्विंटल ३५ किलोचा महारोठ
खामगाव (जि. बुलडाणा) : संग्रामपूर तालुक्यातील पळशी झांशी येथील श्री शंकरगिरी महाराज संस्थानमध्ये यावर्षीही महाशिवरात्रीनिमित्त ७ क्विंटल ३५ किलोचा महारोठ बनविण्यात आला. तसेच बुधवारी दिवसभर यात्रा महोत्सव सुध्दा धार्मिक वातावरणात उत्साहात पार पडला. संग्रामपूर तालुक्यात संग्रामपूर पासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पळसी झांसी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्रीच्या पर्वावर शंकरगीरी महाराज यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या पर्वावर शेकडो वर्षांंपूर्वी महान तपस्वी शंकरगिरी महाराजांनी सुरु केलेली रोठ तयार करुन महाप्रसादाची परंपरा आजही कायम आहे. या महारोठाच्या सेवनाने सुख शांती प्राप्त होवून आजार बरे होतात, अशी भाविकांची श्रध्दा असते. त्यामुळे मोठय़ा संख्येने भाविक हा महारोठाचा प्रसाद घेण्यासाठी येथे येतात.
यावर्षी महारोठ ७ क्विंटल ३५ किलो चा तयार करण्यात आला होता. हा महारोठ तयार करण्यासाठी काजू, बदाम, किसमिस, सोफ, जिरा, केसर, विलायची या सोबतच ८0 लिटर दुध, ७0 किलो तूप, दीड क्विंटल साखर, दीड क्विंटल गव्हाचे पीठ वापरण्यात आले. १0 मीटर सूती कापड व त्यावर केळीची पाने लावून रात्रभर हा महारोठ तयार करण्यात आला. महाशिवरात्रीच्या रात्री ९ वाजेपासून २५ -३0 भाविकांकडून हा महारोठ तयार करणे सुरु होवून दुसर्या दिवशी पहाटे महारोठ तयार झाला होता. १८ फेब्रुवारी रोजी दिवसभर या महारोठाचा प्रसाद भाविकांना वितरीत करण्यात आला. या महारोठाचा प्रसाद घेण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील तसेच लगतच्या अकोला, जळगाव व अमरावती या जिल्ह्यातील भाविकांनीही हजेरी लावली होती. यामुळे काल तसेच आज पळशी झांशी येथे हर्षोल्हासाचे वातावरण निर्माण झाले होते.