करडी, पद्मावती धरण गळतीची तज्ज्ञ समितीकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 02:59 PM2019-08-23T14:59:27+5:302019-08-23T14:59:59+5:30

धरणातून होत असलेल्या गळतीची धरण सुरक्षा समितीच्या सदस्यांनी दोन्ही प्रकल्प १०० टक्के भरलेले असताना पाहणी केली.

Kardi, Padmavati Dam Examination by Expert Committee | करडी, पद्मावती धरण गळतीची तज्ज्ञ समितीकडून पाहणी

करडी, पद्मावती धरण गळतीची तज्ज्ञ समितीकडून पाहणी

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/धाड: तिवरे धरण फुटीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील मराठवाड्याच्या सीमेलगत असलेल्या धाड नजीकच्या करडी आणि पद्मावती (मासरूळ) धरणातून होत असलेल्या गळतीची धरण सुरक्षा समितीच्या सदस्यांनी दोन्ही प्रकल्प १०० टक्के भरलेले असताना पाहणी केली. दरम्यान, समितीमधील तज्ज्ञांनी सुचविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्राधान्याने पूर्णत्वास नेण्याच्या हालचाली पाटबंधारे विभागाने हाती घेतल्या आहेत.
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेतंर्गत कार्यरत असलेल्या धरण सुरक्षा संघटनेचे अधीक्षक अभियंता एन. सी. तायडे, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेचे अधीक्षक अभियंता (धरण) पाठक आणि जलसंपदा विशेष प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता आर. व्ही. जलतारे, अकोला सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकूर देसाई आणि बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी या दोन्ही प्रकल्पांची २२ आॅगस्ट रोजी दुपारी पाहणी केली.
गेल्या एक महिन्यापूर्वी धाड लगतच्या करडी आणि मासरूळ प्रकल्प (पद्मावती) प्रकल्पातून गळती होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले होते. तिवरे धरण फुटीची आणि जालना जिल्ह्यातील धामणा धरणातून होत असलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर ही बाब पाटबंधारे विभागाने गांभिर्याने घेतली होती. त्यानुषंगानेच आठ जुलै रोजीच दोन्ही धरणातून होत असलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर स्थळ पाहणी करून नाशिक येथील धरण सुरक्षा संघटनेचे अधीक्षक अभियंता एन. सी. तायडे यांना पत्र पाठवले होते. त्यानुषंगाने २२ आॅगस्ट रोजी धरण सुरक्षा समितीच्या या तज्ज्ञ समितीने ही पाहणी केली. यावेळी पद्मावती (मासरूळ लघू प्रकल्प) धरणाच्या आऊटलेट पाईमधून (हेड वेल) आणि धाड जवळच्या करडी प्रकल्पाच्या सांडव्या लगतच्या संरक्षक भिंतीतून होत असलेल्या पाण्याच्या गळतीच्या संदर्भाने तज्ज्ञ समितीने पाहणी केली. प्रकल्प सध्या १०० टक्के भरलेले असल्याने तातडीने येथे संपूर्ण दुरुस्ती करणे शक्य नसल्याने मार्च, एप्रिल २०२० मध्ये दोन्ही ठिकाणची दुरुस्ती करण्यात येणार आहे. मात्र तज्ज्ञ समितीने दिलेल्या सुचनेनुसार तातडीने येथे प्रतिबंधात्क उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. दोन्ही प्रकल्पातून गळती होत असली तरी गळतीचे पाणी हे गढूळ नसल्याचे सांगण्यात आले. मासरूळ प्रकल्पावरील गळती रोखण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले.


जिगाव पूनर्वसन प्रकल्पातंर्गत होणार काम
करडी व मासरूळ प्रकल्पातून होणारी गळती रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कामे ही खामगाव जिगाव प्रकल्प पूनर्वसन विभागातंर्गत येथील कामे करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, गळतीच्या संदर्भाने पाटबंधारे विभाग हा स्थानिकांच्याही संपर्कात नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे मतही तज्ज्ञ समितीने यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करताना व्यक्त केले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. आठ वर्षापासून या दोन्ही प्रकल्पामधून गळती होत असल्याची ओरड होती. त्या पृष्ठभूमीवर तज्ज्ञ समितीने ही पाहणी केली आहे.

विमोचक विहीरचे काम नव्याने- सुपेकर
मासरूळ (पद्मावती) प्रकल्पाच्या विमोचकाचा पाईप डिसलोकेट झालेला आहे. त्यातून गळती होत आहे. मात्र काळजीचे कारण नाही असे बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता नितीन सुपेकर म्हणाले. दरम्यान विमोचक विहीरीचे नव्याने काम करणे गरजेचे आहे. मार्च एप्रिलमध्ये ते करता येईल. सोबतच या कामासाठी मध्यवती संकल्प चित्र संघटना यांच्याशी बोलून येथील काम करण्यास प्राधान्य राहील असे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच या प्रश्नी आम्ही स्थानिकांच्याही संपर्कात आहोत, असे ते म्हणाले. १९९८ दरम्यान या प्रकल्पाचे काम झाले असून आता गळती होत असलेल्या ठिकाणी आरसीसीमध्ये काम करण्यात येऊन विमोचक विहीरीचेही मार्च, एप्रिल मध्ये नव्याने काम करण्याचे प्रस्तावीत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Kardi, Padmavati Dam Examination by Expert Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.