बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी

By Admin | Updated: September 21, 2014 00:38 IST2014-09-21T00:14:03+5:302014-09-21T00:38:06+5:30

खामगाव येथे माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत झाले उघड.

A job based on fake documents | बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी

बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी

खामगाव (बुलडाणा): बनावट शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे शासकीय नोकरी बळकावल्याचा प्रकार माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीच्या आधारे उघड झाला आहे. त्यामुळे शासनाची अशी फसवणूक करणार्‍यावर कारवाई करावी; तसेच पगारापोटी मिळालेली रक्कम वसूल करावी, अशी मागणी शालिकराम जगराम चव्हाण चिंचखेड बंड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत विविध ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयात पदभरतीबाबत जाहिरात देण्यात आलेली होती. यामध्ये चपराशी पदासाठी चवथा वर्ग उत्तीर्ण असणार्‍यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आलेले होते. पदभरतीमध्ये मुलाखतीनंतर सुपडा गुलाब पवार कवडगाव ता. खामगाव यांची नियुक्ती परिचर या पदावर करण्यात आली असून, सध्या सुपडा पवार हे प्राथमिक आरोग्य केंद्र रोहणा येथे परिचर पदावर कार्यरत आहेत. पदभरतीवेळी सुपडा पवार यांनी मराठी प्राथमिक शाळा ढोरपगाव येथील १२१६ क्रमांकाचा शाळा सोडल्याचा दाखला जोडला होता.
त्या दाखल्यावर ६ वा वर्ग उत्तीर्ण असे नमूद आहे; मात्र जोडलेला दाखला हा बनावट व खोटा तयार करून त्या खोट्या दाखल्याच्या आधारे त्यांनी चपराशी पदाची नोकरी मिळविली आहे.
शाळा सोडल्याचा दाखला हा रजिष्टर नं.१२१६ पा.क्र.४५ जा.क्र.२३२, २ मे १९७९ मराठी पूर्व माध्यमिक शाळा ढोरपगाव असा दिलेला असून, या नंबरचा दाखला हा दुसर्‍याच विद्यार्थ्याचा असल्याचे उघड झाले आहे. तर सुपडा पवार यांची शैक्षणिक पात्रता तिसरा वर्ग एवढीच आहे; परंतु त्यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारे नोकरी मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा खोटा दाखला तयार करून त्याद्वारे नोकरी मिळविली आहे. यासंबंधीचे शाळेचे मूळ दस्तऐवज मुख्याध्यापक यांच्याकडे असून, त्यासंबंधी माहिती व दाखला मागितला असता जाणीवपूर्वक देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तेव्हा मुख्याध्यापक ढोरपगाव यांच्याकडून मूळ दाखल खारीज रजिष्टर बोलावून शहानिशा करावी, अशी मागणी शालिकराम चव्हाण यांनी केली आहे.

Web Title: A job based on fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.