जिजाऊंची दूरदृष्टी सर्वांसाठी प्रेरणादायी: राजेश टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:31 IST2021-01-13T05:31:13+5:302021-01-13T05:31:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिंदखेड राजा: प्रजाहित जाणणारा राजा ज्या माउलीने घडविला. त्या जिजाऊंच्या भूमितून कायमच प्रेरणा मिळत आली. कणखर ...

जिजाऊंची दूरदृष्टी सर्वांसाठी प्रेरणादायी: राजेश टोपे
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेड राजा: प्रजाहित जाणणारा राजा ज्या माउलीने घडविला. त्या जिजाऊंच्या भूमितून कायमच प्रेरणा मिळत आली. कणखर राजमाता आणि लोकमाता म्हणूनही जिजाऊंकडे पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी येथे केले. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ सृष्टीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मराठा सेवा संघाच्यावतीने दिला जाणारा मराठा विश्वभूषण पुरस्कार टोपे यांना देण्यात आला. आपले मनोगत आणि सत्काराला उत्तर देताना टोपे यांनी हा सत्कार अथवा हा पुरस्कार आपल्या एकट्याचा नसून, आपल्या सोबत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या काम केलेल्या प्रत्येकाचा आहे, असे सांगितले. जिजाऊ जयंती हा एक जिजाऊ प्रेमींसाठी उत्साहाचा दिवस आहे. संकटाला सामोरे जायला कणखरपणा लागतो. संकटं झेलण्याची शक्ती लागते. ती शक्ती, तो कणखरपणा राजमाता जिजाऊंनी शिवरायांना दिला आणि तोच संदेश आपल्यासाठी देखील आहे. त्यामुळे जिजाऊंच्या विचारांची प्रेरणा प्रत्येकाने घ्यावी, असे ते म्हणाले. आपल्याला मिळालेला हा पुरस्कार आपण राज्यातील कोरोना योध्दे, कोरोना काळात काम करणाऱ्या प्रत्येकाला अर्पण करतो, असे भावपूर्ण उद्गारही त्यांनी यावेळी काढले. जिजाऊ सृष्टीच्या विकासासाठी सहकार्य करणार असल्याचेही ते शेवटी म्हणाले.
बुलडाण्यात वैद्यकीय महाविद्यालय
जिजाऊ सृष्टीवरील मुख्य कार्यक्रमात आयोजकांनी जिजाऊ सृष्टीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याची मागणी केली. आपल्या भाषणात याविषयी बोलताना टोपे यांनी महाविद्यालय बुलडाण्यात मिळेल, असे आश्वासन दिले.