जळगाव, संग्रामपूर तालुक्यांना वगळले
By Admin | Updated: August 29, 2014 23:51 IST2014-08-29T23:48:11+5:302014-08-29T23:51:21+5:30
दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून जळगाव, संग्रामपूर तालुक्यांना वगळले.

जळगाव, संग्रामपूर तालुक्यांना वगळले
नानासाहेब कांडलकर /जळगाव
जळगाव व संग्रामपूर तालुक्यात दुष्काळी स्थिती असताना दुष्काळी तालुक्यांच्या यादीत स्थान न दिल्याने येथील शेतकर्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
बुलडाणा जिल्हय़ात एकूण १३ तालुके आहेत. त्यापैकी पहिल्या यादीत १0 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करण्यात आला व परवा जाहीर झालेल्या दुसर्या यादीत बुलडाणा तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून समावेश करताना जळगाव जामोद व संग्रामपूर हे तालुके मात्र वगळण्यात आले. वास्तविक इतर अकरा तालुक्यांची पीक परिस्थितीची जी स्थिती आहे तीच स्थिती या दोन तालुक्यांचीसुद्धा आहे. पुरेसा पाऊस नाही, पेरणी उशिरा झाली, पिके समाधानकारक नाही, काही शेतकर्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली, काहींची शेते काळीच आहे. काही पिकांना व शेतीला २२ जुलैच्या अतवृष्टीचा फटका बसला ही सर्व भयावह स्थिती असताना या दोन तालुक्यांना कोणत्या आधारावर शासनाने समृद्ध ठरविले असा सवाल शेतकरी करीत आहे. शेतकर्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर असंतोष पसरला असून, याचे रूपांतर काही अघटित होण्यातही होऊ शकतो. त्यामुळे शासनाने या बाबीचा पुनर्विचार करून जळगाव व संग्रामपूर या दोन तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत करावा, अशी शेतकर्यांची मागणी आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीसुद्धा आपसातील मतभेद बाजूला सारत जिल्हाधिकारी व शासन दरबारी हा विषय लावून धरला पाहिजे. येत्या दिवसात विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आचारसंहितेच्या नावाखाली हा विषय बाजूला पडू शकतो. त्यामुळे नेत्यांनी आपली शक्ती पणाला लावून शासनाच्या गळी हा विषय उतरविला पाहिजे. जर हे दोन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित होऊ शकले नाहीत तर शेतकरी व त्यांचे कुटुंबीयांचा प्रचंड असंतोषाला सर्व राजकीय नेत्यांना सामोरे जावे लागणार आहे.