मालमत्ता कर वसुलीत जळगाव अव्वल!

By Admin | Updated: April 9, 2017 02:07 IST2017-04-08T23:53:37+5:302017-04-09T02:07:45+5:30

मालमत्ता कर वसुलीत मेहकर दुस-या स्थानावर तर बुलडाणा तिस-या स्थानी

Jalgaon property tax recovered! | मालमत्ता कर वसुलीत जळगाव अव्वल!

मालमत्ता कर वसुलीत जळगाव अव्वल!

अनिल गवई
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांसह पंचायत समितींनी यंदा मालमत्ता आणि पाणीपट्टीसह अन्य करांच्या वसुलीसाठी मेहनत घेतली; मात्र जिल्ह्यातील जळगाव जामोद नगरपालिकेने मालमत्ता कराची विक्रमी वसुली करीत "अव्वल" स्थान पटकाविले आहे. तर विक्रमी कर वसुलीच्या तालिकेत दुसर्‍या स्थानावर मेहकर नगरपालिका असून, बुलडाणा नगरपालिका मालमत्ता कर वसुलीत तिसर्‍या स्थानी असल्याचे दिसून येते.
स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य शासनाने शासकीय अनुदानासाठी शंभर टक्के कर वसुलीची सक्ती केली होती. शासनाच्या या बडग्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील विविध नगर पालिकांसह नगर पंचायतींनीही सन २0१६-१७ या आर्थिक वर्षांमध्ये कर वसुलीकडे लक्ष केंद्रित केले. काही पालिकांनी सुरुवातीपासूनच उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न केले, अशा पालिकांची मेहनत फळास आली, तर कर वसूलकडे कानाडोळा करणार्‍या पालिका आणि पंचायत समितींनी कर वसुलीचे उद्दिष्ट गाठताना चांगलाच फटका बसला आहे. उपलब्ध आकडेनुसार माहे १ एप्रिल, २0१६ ते ३१ मार्च, २0१७ पर्यंतच्या कालावधीत कर वसुलीत बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगरपालिकेने सर्वाधिक ९६.९८ टक्के मालमत्ता कराची वसुली केली आहे. मेहकर नगरपालिका ९४.९१ टक्के वसुलीच्या माध्यमातून दुसर्‍या तर बुलडाणा नगरपालिकेने तिसरे स्थान पटकाविले आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून ओळख असलेल्या खामगाव नगरपालिकेने स्थापनेनंतर यंदा प्रथमच ९0.१0 टक्के कर वसुली करीत, चौथे स्थान प्राप्त केले आहे.
विविध कारवाईचा परिणाम!
मालमत्ता जप्ती, नळ कनेक्शन कापण्याची कारवाई, थकबाकीदाराच्या दारावर डफडे बजाव मोहीम, थकबाकीदारांच्या याद्या चौकात झळकविण्याच्या मोहिमेसोबतच काही बड्या थकबाकीदारांना कायदेशीर नोटीसही देण्यात आल्या. या कारवाईचा परिणाम आणि पालिका प्रशासनाच्या सांघिक प्रयत्नांमुळे कर वसुलीच्या उद्दिष्टांपर्यंत काही पालिकांना पोहोचता आले. तर उपरोक्त कारवाई चालढकल करणार्‍या बहुतांश पालिकांना कर वसुली मोहिमेत चांगलाच फटका बसला. या पालिकांना आता शासनाच्या रोषाला बळी पडावे लागेल.
बुलडाणा पालिकेचा असाही योगायोग!
पाणीपट्टी वसुलीत बुलडाणा नगरपालिकेने जिल्ह्यात एकूण उद्दिष्टाच्या ९0.८२ टक्के वसुली केली आहे. त्याचवेळी मालमत्ता कराच्या वसुलीतही ९१.0३ उद्दिष्ट गाठले आहे. योगायोग म्हणजे पाणीपट्टी आणि मालमत्ता करातही बुलडाणा नगरपालिकेने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
मलकापूर पालिकेची सुमार कामगिरी!
मालमत्ता कर वसुलीसोबतच, पाणी पट्टी वसुलीतही मलकापूर पालिकेला उद्दिष्टपूर्तीचे ५0 टक्केही उद्दिष्ट गाठता आले नाही. पाणी पट्टीत २७.५३ टक्के तर मालमत्ता करात केवळ २६.३२ टक्के वसुली मलकापूर पालिकेने केली आहे. दोन्ही कर वसुलीत मलकापूर पालिकेची अतिशय सुमार कामगिरी असल्याचेच उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Web Title: Jalgaon property tax recovered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.