स्वॅब विक्री प्रकरणात कामगारांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा मुद्दा ऐरणीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 11:42 IST2021-07-07T11:42:19+5:302021-07-07T11:42:26+5:30
Khamgaon News : आरोग्य, नगरपालिका प्रशासनासोबतच कामगारांनीही स्वत:हून कुटुंबीयांच्या ट्रेसिंगकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे वास्तव आहे.

स्वॅब विक्री प्रकरणात कामगारांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा मुद्दा ऐरणीवर!
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : विम्याच्या लाभासाठी ‘निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह’ बनलेल्या शिवांगी बेकर्समधील कामगारांच्या संपर्कातील अनेकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच करण्यात आले नाही. आरोग्य, नगरपालिका प्रशासनासोबतच कामगारांनीही स्वत:हून कुटुंबीयांच्या ट्रेसिंगकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे वास्तव आहे.
एक लाख २० हजार रुपयांच्या लाभासाठी जनुना येथील शिवांगी बेकर्स येथील कामगारांनी सामान्य रुग्णालय तसेच खासगी कोविड रुग्णालयातील काहीशी संगनमत करून कोरोना पॉझिटिव्हचे स्वॅब खरेदी केले.
बनावट स्वॅबच्या आधारेच शिवांगी बेकर्स कंपनीतील तब्बल ७०-८० कामगारांनी विम्याचा लाभ घेतला तसेच या स्वॅबच्या आधारेच कोविड केअर सेंटरमध्ये उपचार आणि गृहविलगीकरणाचा पर्याय निवडला. गृहविलगीकरणादरम्यान कामगारांना कोणतेही गांभीर्य दिसून आले नसल्याचेही आता समोर येत आहे. पोलिसांनी योग्य दिशेने तपास केल्यास बडे मासे आणि मोठा घोळ समोर येण्याची शक्यता आहे.
निगेटिव्ह असल्याची खात्री!
स्वॅब खरेदी केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह म्हणजेच पूर्णत: निगेटिव्ह असल्याची खात्री या कामगारांना होती. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असताना हे कामगार बिनधास्त होते, अशी चर्चा आता शिवांगी बेकर्स कामगारवर्गात रंगत आहे. त्याचवेळी काही कामगारांनी घरावर लावलेले कोरोना पॉझिटिव्हचे स्टीकर्स, पोस्टर्सही फाडल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे.