बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांना सेना भवनावर पुन्हा निमंत्रण
By Admin | Updated: September 19, 2014 00:35 IST2014-09-19T00:35:30+5:302014-09-19T00:35:30+5:30
महायुतीमधील तणाव : उमेदवारांचा जीव टांगणीला, कार्यकर्ते संभ्रमात.

बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांना सेना भवनावर पुन्हा निमंत्रण
बुलडाणा : आघाडी व महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटण्याऐवजी तो अधिकच गुंतागुतीचा होत आहे. बुधवारी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली शिवसेनेच्या तालुका व शहर प्रमुखाची बैठक रद्द करून हीच बैठक आता २१ सप्टेबरला ठेवण्यात आली आहे. तसे निमंत्रण पदाधिकार्यांना देण्यात आले आहे.
निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तसा युती व आघाडीमध्ये जागा वाटपावरून तणाव वाढतच आहे. त्यात महायुती तुटण्याच्या वावड्याही उठत आहेत. त्यामुळे निवडणुका स्वतंत्र लढाव्या लागणार की काय, अशी चर्चा मतदार संघात सुरू असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. अशातच महायुतीमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबईत घडलेल्या वेगवान घडामोडीनंतर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकार्यांची तातडीची बैठक बोलावली होती. प्रत्येक जिल्ह्यातील तालुका व शहर प्रमुखांना या बैठकीत निमंत्रित केले होते. त्यामुळे तातडीने तालुका व शहर प्रमुख मुंबईला रवाना झाले; मात्र ऐनवेळी तालुका व शहर प्रमुखांची बैठक रद्द करण्यात आली. मुंबईतील रंगशारदा येथे आयोजित या बैठकीला उपस्थित असलेल्या पदाधिकार्यांना दुपारी चार वाजता बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात आले. हीच बैठक पुन्हा २१ सप्टेंवबर रोजी रंगशारदा येथे होईल, असा निरोप देण्यात आला. विशेष म्हणजे २१ सप्टेंबरच्या बैठकीला जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, तालुका प्रमुख, खासदार आणि आमदारांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.