गारपीटीच्या अनुदानातून केली परस्पर कपात
By Admin | Updated: June 18, 2014 00:39 IST2014-06-17T21:42:33+5:302014-06-18T00:39:45+5:30
शाखा व्यवस्थापक व तलाठय़ाविरुध्द गुन्हा

गारपीटीच्या अनुदानातून केली परस्पर कपात
अमडापूर : शेतकर्यांना देण्यात येणार्या गारपिटीच्या अनुदानातून प्रति शेतकरी १00 रुपयांची परस्पर कपात केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तहसीलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अमडापूर पोलिसांनी स्थानिक जगदंबा पतसंस्थेचे शाखाधिकारी व तलाठय़ाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अमडापूर व परिसरात गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकर्यांचे रब्बी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा तलाठी तसेच कृषी विभागाच्या अधिकार्यांमार्फत सर्व्हे करण्यात आला होता. त्यानंतर या शेतकर्यांना दिलासा म्हणून शासनाकडूनआपदग्रस्त शेतकर्यांना विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार परिसरातील शेतकर्यांना अमडापूर येथील जगदंबा पतसंस्था बिगर कृषी पतसंस्थेव्दारे अनुदान वितरीत करण्यात येणार होते. त्यानुसार लाभार्थी शेतकर्यांच्या याद्या व रक्कम या पतसंस्थेकडे पाठविण्यात आली होती. शेतकर्यांना शासनाकडून जाहीर झालेल्या अनुदानातून कोणत्याही प्रकारची रक्कम कपात करु नये असे आदेश असताना सुध्दा एकनाथ गणपत काळे, व्यवस्थापक जगदंबा पतसंस्था अमडापूर यांनी आपदग्रस्त शेतकर्यांच्या अनुदानातून प्रत्येकी १00 रु. प्रमाणे कपात करुन शासनाची व शेतकर्यांची फसवणूक केली व यासाठी तलाठी रियाज शेख भाग नं.३ अमडापूर याने याकामी मदत केली. याबाबतची तक्रार तहसिलदार राजेश्वर वासुदेवराव हांडे वय ४१ चिखली यांनी आज १७ जून रोजी अमडापूर पोलिस स्टेशनला दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी एकनाथ गणपत काळे, व्यवस्थापक जगदंबा पतसंस्था अमडापूर व तलाठी रियाज शेख भाग नं. ३ अमडापूर यांचेविरुध्द कलम ४२0,५00,३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार निशांत मेश्राम करीत आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ माजली असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी परिसरातील शेतकर्यांकडून होत आहे.