एकात्मिक बालविकास प्रकल्पाला समस्यांचे ग्रहण
By Admin | Updated: June 16, 2016 02:16 IST2016-06-16T02:16:37+5:302016-06-16T02:16:37+5:30
चिखली तालुक्यातील दोन स्वतंत्र कार्यालयांचा प्रस्ताव धूळ खात पडून

एकात्मिक बालविकास प्रकल्पाला समस्यांचे ग्रहण
सुधीर चेके पाटील / चिखली (जि. बुलडाणा)
मुले हीच राष्ट्राचे भविष्य असल्याने त्यांची जडणघडण, विकास आणि संवर्धन व्हावे म्हणून केंद्र शासनाकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजना (अंगणवाडी) सुरू आहे; मात्र गेल्या ३0 वर्षांंंपासून प्रत्येक गावात अंगणवाडी कार्यान्वित असूनही बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण कमी होत नसल्याने त्याचे खापर अंगणवाड्यांवर फोडले जाते. वस्तुत: कुपोषण निर्मूलनासह बालकांची जडणघडण होण्याइतपत अंगणवाड्या सक्षम आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत असून, अपुरे कर्मचारी, उघड्यावरील व जीर्ण इमारतींमध्ये भरणार्या अंगणवाड्या, सुमार दर्जाचा पोषण आहार यांसह इतरही अनेक अपुर्या सुविधांमुळे तालुक्यातील बालकांचे भवितव्य आजमितीला धोक्यात आल्याचे चित्र आहे.
चिखली तालुक्यातील सहा सर्कलमध्ये ३२३ अंगणवाडी केंद्रे व आठ मिनी अंगणवाडी केंद्रे अशा एकूण ३३१ अंगणवाड्या कार्यरत असून, या अंगणवाडी केंद्रांमार्फत पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ आरोग्य सेवा, आरोग्य आणि सकस आहारविषयक शिक्षण आणि अनौपचारिक शालेय पूर्वशिक्षण या सहा महत्त्वाच्या सेवा दिल्या जातात. असे असतानाही कुपोषणाबाबत हा तालुका जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे. साहजिकच याचे खापर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पावर फोडले जाते; मात्र ही जबाबदारी त्यांची असली तरी कुपोषण निर्मूलनासह अंगणवाडीतून बालकांना दिल्या जाणार्या सहा महत्त्वपूर्ण सेवा देण्यासाठी तालुक्यातील अंगणवाड्या सक्षम नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
तालुक्यातील एकूण ३३१ अंगणवाड्यांचा संपूर्ण भार येथील ग्रामीण एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प चिखलीचे बालविकास प्रकल्प अधिकारी गट ब वर्ग-२ यांच्यावर असून, या कार्यालयात कर्मचारी संख्या अपुरी आहे. गेल्या नऊ वर्षांंंपासून प्रकल्पास वाहनही उपलब्ध नाही. त्यातच ३३१ पैकी केवळ ११७ अंगणवाडी केंद्रांनाच इमारत असून, त्यापैकी अनेक इमारतींची पडझड झालेली आहे. अनेक इमारती जीर्णावस्थेत असून, बालकांचे जीव धोक्यात आहे.