शेतक-याने बनविले अभिनव फवारणी यंत्र
By Admin | Updated: September 22, 2014 00:44 IST2014-09-22T00:13:24+5:302014-09-22T00:44:27+5:30
लोणार तालुक्यातील युवा शेतक-याने बनविले फवारणी यंत्र; ९0 रुपयात ५ एकर शेतात फवारणी.

शेतक-याने बनविले अभिनव फवारणी यंत्र
बुलडाणा : शेतमजुरांच्या वाढत्या टंचाईमुळे शेतातील कामे करण्याकरिता शेतीपयोगी यंत्राचा वापर अधिक वाढत आहे. पण अशी यंत्र महागडी व खर्चे असतात. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथील श्रीधर घुगे या युवक शेतकर्याने यावर स्वस्त उपाय शोधून काढला. या युवकाने चक्क भंगार मोटरसायकलीवर चालणारे फवारणी यंत्र तयार केले आहे. या यंत्राद्वारे केवळ ९0 रुपयात ५ एकर शेतात फवारणी केली जाऊ शकते. चिंचोली सांगळे या लहानश्या गावात श्रीधर घुगे हे अँटो गॅरेज चालवतात. शेतीक्षेत्रात नवनवीन यंत्र प्रयोग करुन आर्थिक डबघाईस आलेल्या शेतकर्यांना मदत करण्याचा मानस त्यांनी मनात बाळगला. यातून त्यांनी जुन्या मोटरसायकलवर हे फवारणी यंत्र तयार केले. वर्षभर चाचणी घेऊन सर्व बाबींची तपासणी व पूर्तता करून या फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक घुगे यांनी आपल्याच शेतात करून पाहिले आणि ते यशस्वी झाले. घुगे यांनी तयार केलेल्या या अभिनव फवारणी यंत्र परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. ठिकठिकाणाहून शेतकरी व विविध ग्रामपंचायतीचे सरपंच या पंपाचे अवलोकन करण्यासाठी त्यांना भेटी देत आहे. यावर्षी तर घुगे यांनी परिसरातील ८ ते ९ शेतकर्यांच्या शेतामध्ये याच फरवाणी यंत्राद्वारे विनामुल्य फवारणी करुन दिली. त्यामुळे हे यंत्र परिसरातील शेतकर्यांसाठी कौतुकाचा विषय ठरला आहे.