धान्य निवडीतून संख्याज्ञान व एकाग्रता वाढविण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:36 IST2021-09-03T04:36:17+5:302021-09-03T04:36:17+5:30
सध्या विद्यार्थ्यांना शाळा ही नवीनच वाटायला लागली आहे. त्यात प्रथमच शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या ...

धान्य निवडीतून संख्याज्ञान व एकाग्रता वाढविण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम
सध्या विद्यार्थ्यांना शाळा ही नवीनच वाटायला लागली आहे. त्यात प्रथमच शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या आवडीच्या प्रक्रियेतून शिक्षण देण्यासाठी मुख्याध्यापक अनिल चव्हाण हे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या उक्तीप्रमाणे बोराखेडी येथे गरीब, वंचित शेतकरी कुटुंबातील मोबाईलची सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधण्यासाठी व लहान मुलांना शाळेची गोडी लावण्यासाठी विद्यार्थ्यांना पाटीवर चवळी व हरभरा असे धान्य एकत्र करून ते वेगवेगळे करण्यासाठी सांगितले जाते. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढून लक्ष केंद्रित होऊन विद्यार्थी कृती करतात. धान्य वेगवेगळे करताना विद्यार्थी सहज ती मोजतात. म्हणजे सहजपणे मोजण्याचे कौशल्य त्यांना स्वयंअध्ययनातून निर्माण होते. त्यांच्या स्वयंअध्ययनातून विद्यार्थी कुणी ३ पर्यंत, कुणी ५, कुणी १०, तर कुणी १५ पर्यंत संख्या मोजतात. संख्याज्ञान व मोजण्याचे कौशल्य, एकाग्रता व धान्याची ओळख व उपयोग ही उद्दिष्टे या उपक्रमातून आपण साध्य करू शकतो. विशेष म्हणजे यासाठी घरगुती साहित्याचा उपयोग करू शकतो किंवा शालेय पोषण आहारातील धान्याचा उपयोग आपण करू शकतो.
वर्गशिक्षिका अनुप्रीता व्याळेकर या सातत्याने पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अध्यापन करीत असून, आदर्श शाळेतील वर्ग पहिलीला हा पथदर्शी अभ्यासक्रम आहे. तो विद्यार्थ्यांना सहज आकलन व्हावा, आनंददायी वाटावा यासाठी कृतीतून शैक्षणिक अध्यापन देण्यासाठी मनापासून प्रयत्न करीत आहेत. कोविड काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी असे मनोरंजनात्मक उपक्रम इतर शाळेतही राबविल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी निश्चित उपयोगी पडेल, असे मत मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
मनोरंजनातून अध्ययनाकडे वाटचाल
धान्याची आकृती काढणे, चित्र तयार करणे, फुलांची आकृती करणे, धान्य व फुले. पाने यांच्यापासून त्रिकोण, चौकोन तयार करून संख्याज्ञान होणे, रंगविलेले खडे यांची विभागणी करणे, मोजणे, मनोरंजनात्मक गाणी, गोष्टी असे मनोरंजनात्मक शैक्षणिक अध्यापन करून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी व शिक्षणात गोडी निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे शैक्षणिक कार्य आदर्श जिल्हा परिषद शाळा बोराखेडी येथे सुरू आहे. बोराखेडी येथील शिक्षक अशा मनोरंजनात्मक खेळातून विविध नावीन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना आनंदाने ज्ञान देत असल्यामुळे सन २०२१-२२ यावर्षी वर्ग १ लीमध्ये ५७ विद्यार्थी दाखल झाले आहेत.