अन्याय खपवून घेतला जाणार नाही
By Admin | Updated: August 26, 2014 22:21 IST2014-08-26T22:21:02+5:302014-08-26T22:21:02+5:30
समतेचे निळे वादळ संघटना: भाई अशांत वानखडे यांचा इशारा

अन्याय खपवून घेतला जाणार नाही
मलकापूर : राज्यभरातील दलितांवरील अत्याचार, रमाई घरकुल योजनेतील भेदभाव, सर्व जाती धर्मातील गरिबांना दारिद्रय़ रेषेखालील कार्ड असो किंवा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अशा दलित व जनसामान्यांशी निगडित प्रश्नांना हात घालण्याचे काम २२ ऑगस्ट रोजी समतेचे निळे वादळ या नव्यानेच स्थापित संघटनेने केले. भाई अशांत वानखेडे यांच्या नेतृत्वात यावेळी पीडित व शोषितांनी विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढला. जाफ्राबाद तालुक्यातील वरूड येथे भन्ते संबोधीसह ४६ जणांवर दाखल करण्यात आलेला कलम ३0७ चा खटला मागे घेऊन त्यांची हसरूल तुरूंगातून तत्काळ मुक्तता करा, पश्चिम विदर्भात कोरडा दुष्काळ जाहीर करा, भारतीय संविधानातील समतेच्या कलमांचा आदर राखून रमाई आवास योजना शहराप्रमाणे ग्रामीण भागातसुद्धा २ लाख रूपयांत करण्यात यावी, यासोबतच या योजनेसाठी दारिद्रय़ रेषेची असलेली अट रद्द करून वंचिताना लाभ द्यावा, भूमिहीन शेतमजुरांना अतिक्रमित शेतजमिनीचे कायम पट्टे देण्यात यावे, सर्व जाती-धर्माच्या गरिबांना दारिद्रय़ रेषेचे कार्ड देण्यात यावे, सर्व राहत्या झोपड्यांना स्लम घोषित करून ते अतिक्रमण कायम करण्यात यावे, स्वाभिमानी स्वावलंबन योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी, राजमाता जिजाऊ जन्मस्थळास राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा, बौद्धांना बौद्ध म्हणून दाखले द्या, बुलडाण्याच्या जयस्तंभ चौकात नियोजित पुतळे उभारा, अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना भाई अशांत वानखेडे यांनी पोलिस यंत्रणेवर टिकेची झोड उठवत मांडलेले प्रश्न हे दीनदलित व गरिबांचा कैवार घेणारे होते. दबावापोटी पोलिस करत असलेल्या कारवाया दलित समाज सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. समतेचं निळं वादळ ही संघटना समाजाच्या प्रश्नावर लढणारी संघटना असून, कुणाच्याही दबावाखाली ही संघटना काम करत नाही, हे ठामपणे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयावर जमलेला विराट जनसमुदाय हा या मोर्चाच्या प्रश्नांशी निगडित होता. त्यामुळे या प्रश्नांची जाण प्रशासनाला झाली नाही तर येणार्या काळात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला. या मोर्चात जिल्हाभरातील नागरिक उत्स्फरूतपणे सहभागी झाले होते.