उद्योगांना संवर्ग प्रमाणपत्र नाही!
By Admin | Updated: July 18, 2016 02:37 IST2016-07-18T02:37:09+5:302016-07-18T02:37:09+5:30
उद्योगांची रेड, ऑरेज व ग्रीन श्रेणी ठरली नाही!

उद्योगांना संवर्ग प्रमाणपत्र नाही!
नीलेश शहाकार / बुलडाणा
कोणताही उद्योग व त्यातून होणार्या वस्तूनिर्मितीमुळे पर्यावरणास घातक आहे किंवा नाही, याची प्रदूषण मंडळाकडून चाचपणी करून रेड, ऑरेंज व ग्रीन असे संवर्ग प्रमाणपत्र उद्योगांना देण्यात येते. जिल्ह्यात लहान-मोठे एकूण ९९५ उद्योग व प्रकल्प सुरू असल्याची नोंद जिल्हा उद्योग केंद्राकडे आहे. मात्र एकाही उद्योगाची अद्यापही संवर्ग प्रमाणपत्र देण्याबाबत तपासणी झाली नसल्यामुळे या उद्योगांचा पर्यावरणास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
बुलडाणा जिल्ह्यात धान्यावरील प्रक्रिया, तेल व चरबी उद्योग, खाद्यजन्य पदार्थ उत्पादन, लाकूड गिरणी, कागद प्रक्रिया, रसायने, खत आणि नायट्रोजन कंपाऊड, सिथेंटिक रबर उत्पादन, जैविक उत्पादने, अधातू उत्पादन, मूलभूत लोखंड प्रक्रिया व धातूकाम, दाग-दागिने उत्पादन, पाणी प्रक्रिया, मोटार दुरुस्ती, साठवण असे उद्योग असल्याची नोंद जिल्हा उद्योग केंद्रात आहे.
या उद्योगांमुळे जल प्रदूषण, वायू प्रदूषण व इतर पर्यावरणाची हानी होत आहे का? याची प्रदूषण महामंडळ तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मुंबई यांच्याकडून प्रत्येक वर्षाला तपासणी करून श्रेणी ठरविली जाते. त्यांना रेड, ऑरेंज व ग्रीन असे संवर्ग प्रमाणपत्र देण्यात येते. मात्र, ही बाब गांभीर्याने न घेता, जिल्हा उद्योग केंद्रांकडून अद्यापही अशी संवर्ग प्रमाणपत्र देण्याबाबत उद्योगांची तपासणी झाली नाही, हे विशेष.