सुधारित पैसेवारी ३३ पैसे!

By Admin | Updated: November 2, 2015 02:51 IST2015-11-02T02:51:08+5:302015-11-02T02:51:08+5:30

बुलडाणा जिल्हाधिका-यांनी पाठविला शासनाकडे अहवाल.

Improved money 33 paise! | सुधारित पैसेवारी ३३ पैसे!

सुधारित पैसेवारी ३३ पैसे!

बुलडाणा: जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ५९ पैसे आढळून आल्यामुळे जिल्ह्याला दुष्काळ यादीतून वगळण्यात आले होते. यामुळे सर्वत्र रोष व्यक्त केला जात होता. आता जिल्ह्यातील सुधारित पैसेवारी काढण्यात आली आहे. महसूल विभागाने जिल्हाभरात पीक कापणी प्रयोगांची संख्या वाढवून ही सुधारित वस्तुनिष्ठ पैसेवारी काढली आहे. ही पैसेवारी ३३ पैसे एवढी आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कुरुंदकर यांनी ३१ ऑक्टोबर रोजी शासनाकडे तसा अहवाल पाठविला. यानुसार जिल्ह्यातील पीक उत्पादनात घट झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सलग दुसर्‍या वर्षी जिल्हय़ाची पैसेवारी ही ५0 पैशांच्या आत आली आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या दिशेने झेपावला आहे. गत काही वर्षांंंपासून जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती कायम आहे. कधी अतवृष्टी तर कधी अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर संकटाची मालिका सुरू आहे. यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचला आहे. यापूर्वी काढण्यात आलेली नजरअंदाज पैसेवारी ही ५९ पैसे आली होती. महसूल विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक गावात पीक पाहणी कार्यक्रम हाती घेऊन आता दुसर्‍या टप्प्यात सुधारित पैसेवारी काढली आहे. यात शेतकर्‍यांच्या उपस्थितीत चांगल्या, मध्यम आणि कनिष्ठ दर्जाच्या शेतामधील पीक उत्पादनाची प्रत्यक्ष पाहणी महसूल कर्मचार्‍यांकडून करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील तेराही तालुक्याची सुधारित पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आली. प्रत्यक्षात ही वस्तुनिष्ठ पैसेवारी ३३ पैसे आढळून आली. यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक मदतीसह विविध योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळी संकटामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना दुष्काळी पॅकेज मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.

Web Title: Improved money 33 paise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.