मानाच्या लाकडी गणपतीसह पाच गणपतींचे विसर्जन
By सदानंद सिरसाट | Updated: September 28, 2023 18:15 IST2023-09-28T18:14:50+5:302023-09-28T18:15:32+5:30
खामगावात शांततेत विसर्जन सुरू .

मानाच्या लाकडी गणपतीसह पाच गणपतींचे विसर्जन
सदानंद सिरसाट, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (बुलढाणा) : सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीनंतर सायंकाळी ५.३0 वाजतापर्यंत मानाच्या लाकडी गणपतीसह पाच मंडळांच्या श्री गणेशाचे विसर्जन शांततेत झाले आहे. सकाळी ९.२१ वाजता फरशी येथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
येथील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत ३२ श्री गणेश मंडळे सहभागी झाली आहेत. विसर्जन मिरवणुकीत श्री गणेश मंडळांकडून विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यात येत आहेत. मिरवणुकीत गांधीचौकातील वंदेमातरम मंडळाने यंदा प्रथमच हरियाणा हिस्सार येथून बाहुबली हनुमान व शिव तांडव नृत्य पथक निमंत्रित केले. हा देखावा आबाल वृध्दांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्याचे दिसून आले. या देखाव्यासह विविध आखाड्यांच्या मल्लांनी सादर केलेले चित्तथराक प्रात्यक्षिकांनी अनेकांचे लक्ष वेधले. श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी खामगाव शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
मोठ्या मंडळाच्या विसर्जनामुळे मिरवणूक लवकर आटोपणार
मिरवणुकीच्या प्रारंभी खामगावचा राजा मानाचा लाकडी गणेश त्यानंतर तानाजी मंडळ तर तिसऱ्यास्थानी हनुमान मंडळाचा गणपती, राणा मंडळ त्यानंतर चांदमारी येथील मंडळाच्या गणपतीचे विसर्जन आटोपले. त्यामुळे आता उर्वरित गणपती मंडळाचे विसर्जनह
लवकर आणि शांततेत होण्याची चिन्हे आहेत. मिरवणुकीत शहरातील विविध गणेश मंडळांचा सहभाग आहे. यावेळी विविध गणेश मंडळांच्या आखाड्यांनी मल्लखांब तसेच रोप मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर केले.