देऊळगाव राजात अवैध दारू विक्री

By Admin | Updated: April 10, 2017 00:32 IST2017-04-10T00:32:55+5:302017-04-10T00:32:55+5:30

उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष : दुप्पट किमतीने होते दारू विक्री

Illegal liquor sale in Deulgaon Raja | देऊळगाव राजात अवैध दारू विक्री

देऊळगाव राजात अवैध दारू विक्री

देऊळगाव राजा : महामार्ग तथा राज्य महामार्गावरील अपघातांचे प्रमाण लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने या मार्गावरील दारू विक्री दुकाने तथा बीअर बार बंद करण्याचा आदेश दिल्यानंतरही शहर परिसरात अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असून, उत्पादन शुल्क तसेच पोलीस विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच दारू विक्रेते मूळ किमतीच्या दुप्पट किमतीने खुलेआम दारू विकत असल्याचे पहावयास मिळत आहे.
देऊळगाव राजा शहरामध्ये व परिसरात देशी दारू, बीअर शॉपी तसेच बीअर बार, अशी एकूण २७ दुकाने आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिलपासून सर्वच दारूची दुकाने बंद झाली असली, तरी शहर परिसरात अवैध दारू विक्रेत्यांनी दारू विक्रीचा गोरखधंदा सुरू करून उच्छाद मांडला आहे. दररोज लाखो रुपयांची दारू विक्री होत असून, याकडे पोलीस तथा उत्पादन शुल्क विभाग डोळेझाक करीत आहे. विदर्भ-मराठवाडा सीमेवर असलेल्या देऊळगाव राजा शहरामध्ये चोरट्या मार्गाने दारू माफिया दारूसाठा उपलब्ध करीत आहेत. व्यसनाधिन झालेल्या मजुरांना दारूसाठी दुप्पट किंमत मोजावी लागत आहे.
न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वप्रथम महिला वर्गाकडून स्वागत झाले. आतातरी घरातील कर्ता पुरुष दारूच्या अधीन होणार नाही, अशीच काही अपेक्षा या महिलांची होती. मात्र आठ दिवस उलटूनही दारूची अवैध विक्री सुरू असल्याने कित्येक कुटुंबामध्ये कलहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. शहरापासून अवघ्या २५ कि.मी.वर असलेल्या जालना शहरातील काही वाईन शॉप बीअर बार व दारू विक्रीची दुकाने सुरू असल्याने देऊळगाव राजा शहरातील दारू विक्रेते या ठिकाणाहून दारू आणून शहरात दुप्पट भावाने विक्री करत आहेत. अशा परिस्थितीत भविष्यात बनावट दारूचा साठा सुद्धा शहरात उपलब्ध होऊन त्यातून अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी अवैध दारू विक्रीकडे लक्ष देऊन उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलीस विभागाने ठोस कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Illegal liquor sale in Deulgaon Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.