ज्ञानगंगा नदीपात्रात अवैध वीटभट्टय़ा

By Admin | Updated: May 14, 2014 23:57 IST2014-05-14T23:32:32+5:302014-05-14T23:57:32+5:30

कोणतीही शासकीय परवानगी नसताना ज्ञानगंगा नदीपात्रात वीटभट्टय़ा लागत आहेत.

Illegal bribery in Dnyanganga river bank | ज्ञानगंगा नदीपात्रात अवैध वीटभट्टय़ा

ज्ञानगंगा नदीपात्रात अवैध वीटभट्टय़ा

नांदुरा: कोणतीही शासकीय परवानगी नसताना तलाठी व मंडळ अधिकारी तसेच वरिष्ठ महसुली अधिकार्‍यांना मॅनेज करुन मागील तीन महिन्यांपासून नांदुरा शहराजवळील ज्ञानगंगा नदीपात्रात वीटभट्टय़ा लागत आहेत. या भट्टीमधून निघणार्‍या धुरामुळे परिसरातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून वीटभट्टय़ांची राख व कोळसा नदीपात्रात पडून राहत असल्याने ज्ञानगंगा नदीच्या जलप्रदूषणात वाढ होत आहे. वीटभट्टय़ांमधून निघणारा धूर व मातीचे कण यामुळे नागरिकांना त्रास होऊन श्‍वसनाचे आजार बळावतात. त्यामुळे मानवी वस्ती व गावाजवळ वीटभट्टय़ांना परवानगी देऊ नये व त्याकरिता प्रदूषण नियंत्रण बोर्डाचा परवाना घ्यावा, असे शासन आदेश आहेत; मात्र असे असतानाही नांदुरा शहराजवळून जाणार्‍या ज्ञानगंगा नदीपात्रात काहींनी वीटभट्टय़ांचा व्यवसाय थाटला आहे. शहराजवळील भागात आठ ते दहा वीटभट्टय़ा जोमात सुरु झाल्या आहेत. याबाबत काही जागृत नागरिकांनी तहसील प्रशासनाला माहिती देऊन कारवाईबाबत विनंती केली होती; मात्र अद्यापही महसूल विभागाने कोणतीच कारवाई वीटभट्टय़ांवर केली नाही. तहसील कार्यालयात याबाबत विचारणा केली असता तहसीलदार दौर्‍यावर गेले असून, वीटभट्टय़ांवर कारवाईबाबत मंडळ अधिकार्‍यांना नोटिसेस दिल्या असल्याची माहिती देण्यात आली. तालुक्यात आजही शंभरपेक्षा जास्त वीटभट्टय़ा अवैध व राजरोसपणे जोमात सुरु आहेत. त्या सर्वांना महसूल विभागाने अभय दिल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत असून, शासनाचे महसुली नुकसान होत आहे.   

Web Title: Illegal bribery in Dnyanganga river bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.