दोन वर्षांपासून शिक्षक मिळेना
By Admin | Updated: February 19, 2015 00:25 IST2015-02-19T00:25:22+5:302015-02-19T00:25:22+5:30
उर्दू शाळेचा भार एकाच शिक्षकावर; चिखली पंचायत समितीत भरविली शाळा.
दोन वर्षांपासून शिक्षक मिळेना
चिखली (जि. बुलडाणा) : एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने शाळांची गुणवत्ता वाढून पटसंख्या वाढविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे दोन वर्षापासून शाळेला शिक्षक मिळत नाही म्हणून आंदोलन करण्याची वेळ विद्यार्थी व पालकांवर ओढावल्याने इसोली येथील जि.प. उर्दू माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसह शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी १८ फेब्रुवारी रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातच शाळा भरवून शिक्षकाची मागणी केली.
तालुक्यातील इसोली येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या इयत्ता १ ते ५ पर्यंतच्या प्राथमिक शाळेत आजरोजी २२ मुले व ४0 मुली असे एकूण ६२ विद्यार्थी संख्या आहे. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची ३ पदे मंजुर आहेत. मात्र, सन २0१२ पासून यातील १ पद रिक्त असल्याने गत दोन वर्षांपासून १ ते ५ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दोन शिक्षकांवर आहे. असे असताना या दोन शिक्षकांपैकी नईमउल्ला नजरउल्ला या शिक्षकाची किन्होळा येथे तात्पुरती व्यवस्था म्हणून नियुक्ती केल्याने इसोली येथील शाळेतील १ ते ५ पर्यंतच्या मुलांना केवळ एकच शिक्षक उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबीने संतप्त पालक व शाळा समितीच्या पदाधिकार्यांनी १८ फेब्रुवारी रोजी उर्दू शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसमवेत पंचायत समितीचे कार्यालय गाठून शिक्षकाची मागणी केली. दरम्यान गटशिक्षणाधिकार्यांनी ग्रामस्थांचे गर्हाणे ऐकूण तातडीने कारवाई करून शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत लेखी अश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.