दीडशे गटसचिवांवर उपासमारीची वेळ
By Admin | Updated: July 10, 2015 00:04 IST2015-07-10T00:04:09+5:302015-07-10T00:04:09+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील प्रकार; नऊ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने बेमुदत उपोषणाचा इशारा.

दीडशे गटसचिवांवर उपासमारीची वेळ
चिखली (जि. बुलडाणा): जिल्ह्यातील सुमारे १५0 गटसचिवांचा पगार गेल्या नऊ महिन्यांपासून न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दुसरीकडे जिल्हा देखरेख संस्था यासंदर्भातील आपली जबाबदारी झटकत असल्याने गटसचिवांच्या अडचणीत भर पडत असून, अनेक गटसचिवांच्या पाल्यांचा शिक्षणाचाही प्रश्न यामुळे गंभीर बनला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गटसचिवांच्या पगाराची रक्कम संबंधित संस्थेकडे भरण्यास मनाई केल्यामुळे जिल्हा देखरेख सहकारी संस्थेकडे निधी नसल्याचे कारण दाखवून जिल्ह्यातील गटसचिवांचे ऑक्टोबर २0१४ ते जून २0१५ पर्यंतचा तब्बल नऊ महिन्यांचा पगार थकला आहे. विशेष म्हणजे, सद्यस्थितीत जिल्हा देखरेख सहकारी संस्था आणि जिल्हा सहकारी बँक या दोन्ही ठिकाणी प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक काम पाहत आहेत. असे असताना गटसचिवांना तब्बल नऊ महिन्यांपासून वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोप बुलडाणा जिल्हा गटसचिव संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव मेरत यांनी केला आहे. बँक आणि गटसचिवांच्या कामकाजाचे उद्दिष्ट एकच असतानाही बँकेतील कर्मचार्यांना नियमितपणे वेतन देण्यात येते, तर गटसचिवांना पगाराबाबत का डावलण्यात येते, हा प्रश्न उपस्थित करून संघटनेने जिल्हा देखरेख सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेकडे वारंवार मागणी करूनही थातूरमातूर उत्तरे देऊन गटसचिवांची केवळ शाब्दिक बोळवण केली जात आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या वसुलीबाबत गटसचिवांनी बँकेच्या अधिकारी व कर्मचार्यांपेक्षा सक्षमतेने काम करून कर्जवसुली मोठय़ा प्रमाणावर केली असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.