शेगाव: बसस्थानकाच्या शौचालयात शौचास बसलेल्या इसमाची एक लाख रुपये असलेली पिशवी एका वेड्याने लंपास केल्याची घटना आज मंगळवारी शेगावात घडली; मात्र वेडा इसम हा त्या पिशवीतील नोटा हातात घेऊन फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मच्छींद्रखेड ता. शेगाव येथील पद्माकर रामराव भारंबे हे आठवडी बाजाराच्या निमित्ताने आज मंगळवारी दुपारी शेगाव आले व त्यांनी बँकेतून एक लाख रुपये काढले. दरम्यान, बसस्थानकातील सार्वजनिक शौचालयात जात असताना खिडकीत पैसे असलेली थैली ठेवली असता, बस स्थानक परिसरात फिरणार्या एका वेड्याने खिडकीतील थैली लंपास केली. शोधाशोध केली असता ती मिळून आली नाही. दुसरीकडे सदर वेडा इसम थैलीतील नोटा काढून हातात घेऊन फिरत असताना आठवडी बाजारातील अ. गफार शे. महेबुब या भंगार व्यवसाय करणार्या इसमाने सदर वेड्या इसमाकडून थैली हिसकून या बाबतची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पो.हे कॉ. रवींद्र सोळंके, हरिदास बोरकर आणि जिल्हा विशेष शाखेचे पोहेकॉ अरुण कुटाफळे यांनी घटनास्थळ गाठून एक लाख रुपये असलेली पिशवी ताब्यात घेतली. भंगार व्यावसायिक यांच्या प्रामाणिकपणामुळेच भारंबे यांना त्यांची रक्कम परत मिळाली. प्रामाणिकपणा जिवंत असल्याबद्दल अनेकांनी भंगार व्यावसायिकाचे मनोमन आभार व्यक्त केले.
वेड्याने पळविले एक लाख!
By admin | Updated: June 4, 2014 00:43 IST