Humanity is beyond caste and religion - Prof. Shamsuddin Tamboli | मानवता ही जात आणि धर्माच्या पलिकडे - प्रा. शमसुद्दीन तांबोळी

मानवता ही जात आणि धर्माच्या पलिकडे - प्रा. शमसुद्दीन तांबोळी


खामगाव : शांतता, अंहिसा आणि मानवता ही त्रिसुत्रीच प्रत्येक धमार्ची शिकवण आहे. मात्र, दोन्ही कडील काही आडमुठ्या तत्वांमुळेच समाजातील शांतता भंग पावत आहे. मानवता ही जात आणि धर्माच्या पलिकडे असून, संविधान हा धर्म ग्रंथ म्हणून स्वीकारण्यास काही हरकत नसावी, असे मत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. त्यांच्याशी साधलेला संवाद...

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या प्रमुख उद्देशाबाबत काय सांगाल? 
भारतीय संविधान आणि संविधानातील सामाजिक न्याय, समता आणि बंधुत्वता या मानवी मुल्याची जपणूक करणे हाच मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा प्रमुख उद्देश आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम महिला आणि युवकांना संविधानात्मक अधिकार मिळवून देण्यासाठी या मंडळाचे प्रामाणिक प्रयत्न आहेत.


बकरी ईद निमित्त  रक्तदान शिबिरा मागील संकल्पना काय?  
- कुर्बानीचा अर्थ अधिक समाजाभिमुख व्हावा, त्याग करण्याची मानसिकता वाढावी व सामाजिक सद्भाव वाढावा म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्यावतीने  रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. 


कधीपासून हे रक्तदान शिबिर आयोजित केले जाते?
- गत दहा वर्षापासून बकरी ईद निमित्त   १२ ते १९ आॅगस्टच्या दरम्यान  रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. पूर्वी बकरी ईदच्या दिवशी हे रक्तदान शिबिर आयोजित केले जायचे. मात्र, राज्यभरातून मिळणाºया उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आता या उपक्रमाला सप्ताहाचे स्वरूप प्राप्त होत आहे. पुणे, औरंगाबाद, सांगली, सातारा आणि नागपूर येथील मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडून हा उप्रकम आयोजित केला जातो.  यावर्षी मंडळाने ५१ हजार रूपयांचा निधी नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत म्हणून दिला. बकरी ईदची कुर्बानी टाळून मंडळाने घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. प्रत्येक धर्म शांतता, अंहिसा आणि मानवतावादी आहे. परंतु असे असतानाही हिंसा, अत्याचार आणि शांतता भंगाचे प्रकार वाढीस लागले आहे. या प्रकाराच्या समूळ उच्चाटनासाठी सैध्दांतिक आणि व्यवहारातील धर्मामध्ये ‘समन्वय’ गरजेचा आहे. संविधानाला अभिप्रेत  असणाºया समाज निर्मितीसाठी मुस्लिम  मंडळाचा लढा आहे.


मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना कधी झाली?
माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी कुठलाही धर्म-रूढी-परंपरा अडसर ठरता कामा नये. देश धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र व्हावे या उद्दात्त हेतूने थोर विचारवंत हमीद दलवाई यांनी २२ मार्च १९७० रोजी ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना केली. तत्पूर्वी ‘समान नागरी कायद्यासाठी’ हमीद दलवाई यांनी १९६६ मध्ये विधासभेवर तलका पीडित महिलांचा मोर्चा काढला होता. गत चार दशकात मंडळाने विविध समाजपयोगी उपक्रम राबविले असून आता या मंडळाची सुवर्ण महोत्सवी वर्षांकडे वाटचाल सुरू आहे.

Web Title: Humanity is beyond caste and religion - Prof. Shamsuddin Tamboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.