पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने दवाखाने बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:36 IST2021-08-26T04:36:40+5:302021-08-26T04:36:40+5:30
साखरखेर्डा आणि सिंदखेड राजा येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची श्रेणी एकचे पदे रिक्त आहेत. साखरखेर्डा येथील डॉ. राठोड यांची बदली झाल्यानंतर ...

पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने दवाखाने बंदच
साखरखेर्डा आणि सिंदखेड राजा येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची श्रेणी एकचे पदे रिक्त आहेत. साखरखेर्डा येथील डॉ. राठोड यांची बदली झाल्यानंतर येथे एकाही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली नाही. येथील प्रभार शेंदुर्जन येथील डॉ. शिंगणे यांच्याकडे दिला होता. दोन ठिकाणी काम करणे शक्य नसल्याने साखरखेर्डा येथील प्रभार त्यांनी सोडला. अमडापूर येथे कार्यरत डॉ. राठोड यांना प्रभारी म्हणून नियुक्त केले. ते फक्त आठवड्यातून एक किंवा दोन वेळा येतात. कधी येतात आणि कधी जातात याचा थांगपत्ता लागत नाही. दुसरबीड येथील पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी २ चे पदही रिक्त असून परिचारकही नाही. त्यामुळे तेथील दवाखाना बंदच राहतो. सिंदखेड राजा येथील पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी १ हे पदही रिक्त असून, त्या ठिकाणी किनगाव राजा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गाडेकर हे काम पाहतात. तसेच सिंदखेड राजा तालुक्यात मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना अंतर्गत मोबाइल व्हॅन ( फिरते पथक ) मंजूर आहे. त्यावरही पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने डॉ. गाडेकर यांनाच काम पहावे लागत आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे ही अनेक वर्षांपासून रिक्त असताना एकही लोकप्रतिनिधी यावर बोलायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे गोधन आजारी पडले आहेत. एखादी साथ सुरू झाली तर त्यावर उपचार कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तालुका पशुवैद्यकीय अधिकारी हे पद ही रिक्तच असून, प्रभार माझ्याकडे आहे. जमेल त्या प्रकारे सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-डॉ. संदीप उदार,
प्रभारी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, सिंदखेड राजा