‘आपले भूमी अभिलेख’ उलगडणार भूमापनाचा इतिहास!
By Admin | Updated: April 10, 2017 00:01 IST2017-04-10T00:01:25+5:302017-04-10T00:01:25+5:30
बुलडाणा- १० एप्रिल रोजी असलेल्या भूमापन दिनानिमित्त बुलडाण्यातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने ‘आपले भूमी अभिलेख’ नावाच्या चित्ररूप प्रदर्शनातून भूमापनाचा इतिहास उलगडणार आहे.

‘आपले भूमी अभिलेख’ उलगडणार भूमापनाचा इतिहास!
आज भूमापन दिन : बुलडाणा येथे चित्र प्रदर्शन
बुलडाणा : सिंधू संस्कृतीत कोनमापक यंत्राने जमिनीची मोजणी होत असल्याचे इतिहासाद्वारे उलगडले आहे; मात्र आता विज्ञानाने विलक्षण झेप घेतली असून, जमिनीचे मोजमाप आता थेट उपग्रहाद्वारे होत आहे. १० एप्रिल रोजी असलेल्या भूमापन दिनानिमित्त बुलडाण्यातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने ‘आपले भूमी अभिलेख’ नावाच्या चित्ररूप प्रदर्शनातून भूमापनाचा इतिहास उलगडणार आहे.
राज्यामध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत पूर्वी झालेल्या जमिनीच्या सर्वेक्षणाचे अभिलेख जतन केले जातात. विभागामार्फत जमिनीची हद्द कायम मोजणी केली जाते, तसेच वेळोवेळी जमिनीच्या अभिलेखात सुधारणा करून त्यांचे मालकी हक्क अबाधित राहण्यासाठी खाते प्रयत्नपूर्वक अभिलेख दुरुस्तीची कार्यवाही करते. एकेकाळी शंखू साखळीद्वारे सर्वेक्षण करणारा भूमी अभिलेख विभाग आज हद्द कायम मोजणी करण्यासाठी फलकयंत्राचा वापर करीत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून भूमी अभिलेख खात्यामार्फत ईटीएस मशीनसारख्या आधुनिक यंत्राचा वापर करून अचूक मोजणीचे काम केले जाते. नवीन मोजणी तंत्रज्ञानामुळे सुमारे ३०-३५ एकरांचे मोजणीचे काम करून संगणकावर आज्ञावलीद्वारे नकाशा तयार होतो. सिंधू संस्कृतीत कोनमापक यंत्राने होणारे जमिनीचे मोजमाप त्यानंतर या पद्धतीत होत गेलेली स्थित्यंतरे आणि आता थेट उपग्रहाद्वारे भूमापनासाठी सज्ज झालेला भूमी अभिलेख विभाग १० एप्रिल रोजी भूमापन दिन साजरा करीत आहे. यानिमित्ताने जिल्हा भूमी अभिलेख बुलडाणा, उपअधीक्षक भूमी अभिलेख, बुलडाणा या कार्यालयाच्या वतीने ‘आपले भूमी अभिलेख’ या नावाचे भूमी अभिलेखाविषय, भूमापनाचा इतिहास उलगडून दाखविणारे चित्ररूपी प्रदर्शन उपअधीक्षक भूमी अभिलेख बुलडाणा या कार्यालयात आयोजित केले आहे.
भूमापनासाठी आधुनिक यंत्रणेचे साहाय्य
भूमापनासाठी आधुनिक यंत्रणेचे साहाय्य घेतले जात असल्याने भूमापनही अचूकपणे होत आहे. भूमी अभिलेख विभागाने सद्यस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राचा पुनर्मोजणी करण्याचे महत्त्वाकांक्षी काम हाती घेतलेले आहे. यामध्ये रिमोट सेन्सिंग उपग्रहाद्वारे प्राप्त होणाऱ्या प्रतिमांचा वापर करून जमिनीच्या मोजणीचे काम अचूक होणार आहे.
जमिनीचे मोजमाप आता थेट उपग्रहाद्वारे भूमापनासाठी सज्ज झाले आहे. भूमापनाचा इतिहास नागरिकांना माहिती व्हावा, यासाठी १० एप्रिल रोजी असलेल्या भूमापन दिनानिमित्त बुलडाण्यातील भूमी अभिलेख कार्यालयात ‘आपले भूमी अभिलेख’ नावाच्या चित्ररूपी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शन हे दिवसभर खुले राहणार आहे.
- सु.प्र. जाधोर, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख बुलडाणा.