गणरायांच्या आगमनासोबत दमदार पाऊस
By Admin | Updated: September 17, 2015 23:27 IST2015-09-17T23:27:37+5:302015-09-17T23:27:37+5:30
बुलडाणा जिल्ह्यात पावसाची हजेरी; दोन दिवसात ४८८ मि.मी पाऊसाची नोंद.

गणरायांच्या आगमनासोबत दमदार पाऊस
खामगाव : मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर मंगळवारपासून परतीच्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली; मात्र गुरुवारी गणरायांच्या आगमनासोबतच संपूर्ण जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडल्याने समाजमन आनंदले आहे. सध्या पाऊस परतीच्या मार्गावर असून, या आठवड्याभरात दुसर्यांदा पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. मंगळवारी सायंकाळनंतर जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. तर बुधवारी पुन्हा रात्रीपासून वादळ वार्यासह पावसाला सुरुवात झाली, गुरुवार दुपारपर्यंत जिल्हाभरात पाऊस सुरुच होता. गत दोन दिवसात जिल्ह्यात ४८८.८ मि.मी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली. याची सरासरी ३७.६ एवढी आहे. तर १७ सप्टेंबर रोजी दुपारी झालेल्या पावसामुळे मोताळा तालुक्यात काही ठिकाणी घरांची पडझड झाली तर पिकांना फटका बसला. जिल्ह्यात दोन तासात १४३.८ मि.मी.पावसाची नोंद झाली. तर बुधवारी सायंकाळी पुन्हा जिल्ह्याला वादळवार्यास मुसळधार पावसाने झोडपून काढले. आज, १७ सप्टेंबरच्या दुपारपर्यंत पाऊस सुरुच होता. बुलडाणा शहरासह सागवण, सुंदरखेड, भादोला कोलवट भागात पावसाचा मोठा फटका बसला; तसेच धाड परिसरातील चांडोळ, म्हासरुळ, वरुड, म्हसला, जामठी, डोमरुळ, टाकळी, जाम, धामणगाव धाड परिसरात या परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. तर काही ठिकाणची जमीनही खरडून निघाली. मोताळा तालुक्यात पावसामुळे बुधवार, १६ सप्टेंबर रोजी वादळी वार्यासह पाऊस आला. काही भागात अतवृष्टी झाली होती. यामुळे डिडोळा खु., डिडोळा बु., घुसर, सिंदखेड लपाली, पिंपळगाव देवी, निपाना आदी परिसरात सोयाबीन, कपाशी, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले. तर वादळवार्यामुळे काही ग्रामस्थांच्या घरावरील पत्रे उडून गेली. काही ठिकाणी वृक्षही उन्मळून पडले, तर आज, १७ सप्टेंबर रोजीही तालुक्यात पावसाने हजेरी लावली.