आरोग्य उपकेंद्र झाले शोभेची वास्तू

By Admin | Updated: June 28, 2014 22:39 IST2014-06-28T22:29:39+5:302014-06-28T22:39:12+5:30

या उपकेंद्रात गेल्या ४ महिन्यापासून आरोग्य सेविका नसल्यामुळे रुग्णांना प्राथमिक उपचारापासून वंचित रहावे लागत आहे.

Healthcare epicenter | आरोग्य उपकेंद्र झाले शोभेची वास्तू

आरोग्य उपकेंद्र झाले शोभेची वास्तू

झोडगा : नरवेल प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत झोडगा येथे आरोग्य उपकेंद्र आहे. मात्र या उपकेंद्रात गेल्या ४ महिन्यापासून आरोग्य सेविका नसल्यामुळे परिसरातील नागरिकांचे चांगलेच हाल होत असून रुग्णांना प्राथमिक उपचारापासून वंचित रहावे लागत आहे.
झोडगा येथील आरोग्य उपकेंद्राला हरसोडा, काळेगाव, हरसोडा नवीन, धोंगडी, अनुराबाद, झोडगा आदी गावे जोडलेली असून या गावातील लोकसंख्या ७ हजाराच्या जवळपास आहे. झोडगा आरोग्य उपकेंद्रात यापूर्वी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती नुरबानो पठाण यांची गेल्या ४ महिन्यापूर्वी बोराखेडी आरोग्य केंद्रात बदली झाली आहे. तेव्हापासून ते आजतागायत या उपकेंद्राला आरोग्यसेविकाच मिळाली नसल्याने सदर उपकेंद्र बंद असते. त्यामुळे हे उपकेंद्र आता केवळ शोभेची वास्तू बनून राहिले आहे.
परिसरातील नागरिक व रुग्ण उपचारास या उपकेंद्राकडे वळतात. परंतु उपकेंद्र कुलूप बंद आढळल्याने अनेकांना उपचाराविना राहावे लागते. उपकेंद्र संध्याकाळी किंवा सकाळी उघडेल या आशेने चकरा मारतात. अखेर शहरात जावून उपचार घ्यावा लागतो. उपकेंद्रात आरोग्य सेविकेच्या निवासाची व्यवस्था आहे मात्र येथे आरोग्यसेविका नसल्याने सदर निवासस्थान सुध्दा कुलूप बंद अवस्थेत आहे. मात्र याकडे आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे.
आरोग्यसेविका अभावी गरोदर मातांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत असून आरोग्यसेविका विना परिसरातील रुग्णांना कसलाच सल्ला किंवा प्राथमिक उपचार मिळेनासा झाला आहे. यामुळे विशेषत: गोरगरीब शेतमजूर कुटुंबांना शहरात जावून महागडा उपचार घ्यावा लागतो. तरी परिसरातील लोकसंख्येचा विचार करता या उपकेंद्रावर आरोग्य सेविकेची तात्काळ नियुक्ती करावी व आरोग्य सुविधा पुरविण्यात यावी, अशी मागणी परिसरातील गावकर्‍यांकडून होत आहे.

Web Title: Healthcare epicenter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.